परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची आज सकाळपासूनच तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर गर्दी झाली होती. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह संपूर्ण मुंडे कुटुंबीय गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले.
आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास पंकजा मुंडे, खासदार डाॅ.प्रितम मुंडे, आई प्रज्ञाताई मुंडे, बहिण ॲड. यशश्री मुंडे तसेच जावई गौरव खाडे, मुलगा आर्यमान पालवे, अगस्त्य खाडे व परिवारातील अन्य सदस्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंकजा मुंडे स्वतः हातात वीणा घेऊन वारकऱ्यांसोबत भजनात तल्लीन झाल्या होत्या. जिल्हयातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना जाऊन आज दहा वर्षे झाली. पण आजही त्यांचं नुसत नाव घेऊन डोळे बंद केले तर समोर एक हसरा, उमदा आणि प्रत्येकाला आपला वाटणारा चेहरा समोर येतो. एका लोकनेत्याचं जीवनकार्य त्याच्या पश्चातही कसं चालू रहात याचं हे आदर्श उदाहरण आहे. ते आजही आपल्या आचार विचार आणि श्वासात जिवंत आहेत. मुंडे साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, पिडित व सर्व सामान्य वर्गासाठी खर्ची घातलं. अनेक दुर्लक्षित घटकांना, कार्यकर्त्यांना प्रवाहात आणलं. आमदार खासदार बनविणारी फॅक्टरी असंही त्यांना म्हटलं जात होतं. त्यांच्या विचाराचा वारसा आणि वसा जपण, त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हे माझं दायित्व आहे. मी कधीही हा वसा खाली ठेवणार नाही.