वडवणी (जि. बीड) : पावसादरम्यान वीज कोसळून झाडाखाली उभे असलेले बहीण व भाऊ ठार झाल्याची घटना तालुक्यातील मोरवड येथे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. अशोक विष्णुपंत अंडील (१७) व पूजा विष्णुपंत अंडील (१६), अशी मयत बहीण-भावाची नावे आहेत.
मोरवड येथील विष्णुपंत अंडील व त्यांची पत्नी शुक्रवारी दुपारी शेतात कापूस लागवड करतीत असताना मुलगा अशोक अंडील व मुलगी पूजा ही त्यांना मदत करीत होते. त्यादरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कापूस लागवड थांबवून दोघे बहीण- भाऊ हे आंब्याच्या झाडाखाली थांबले. दुसऱ्या झाडाखाली त्यांचे आई- वडील थांबले होते. साडेचार वाजेच्या सुमारास पावसादरम्यान वीज कोसळल्याने झाडाखाली थांबलेले अशोक आणि पूजा हे गंभीररीत्या भाजले. दोघांनाही तात्काळ वडवणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे दोघांना मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, बीड जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत तीन तालुके वगळता इतरत्र पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत मागील २४ तासात बीड ७.१, पाटोदा ११, आष्टी ७.१, गेवराई ३.७, शिरुर ३.३, वडवणी १०.८, अंबाजोगाई ३४.८, माजलगाव ९.३, केज ३३.९, धारुर २२.७ आणि परळी तालुक्यात १४ मि.मी. पावसाची नोंद झाली. एकूण १५७ मि.मी. पाऊस नोंदला असून सरासरी १४.३ आहे. आतापर्यंत एकूण ८१.५ मि.मी. पाऊस झाला.