बीड : सध्या आरोग्य विभागावर प्रचंड ताण आहे. आम्ही येऊन बडबड करू; पण खरोखरच सांगतो सीएस साहेब, आम्हाला माहीत आहे तुमच्यावर दबाव आहे; पण काम छान चालू आहे, असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांची पाठ थोपटली. असेच करत राहा. गरज पडल्यास आम्हाला आवाज द्या, असे आश्वासनही दिले. यावेळी त्यांनी आष्टी, पाटोदा तालुक्यांसाठी कार्डियाक रुग्णवाहिकेचीही मागणी केली.
जिल्ह्यात सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. रोज रुग्णसंख्या दीड हजारीपार जात आहे. खाटा, औषधी, ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. यावर नियोजन करण्याचे सोडून काही लोक, नेते आरोप, प्रत्यारोप करून प्रशासनाला टार्गेट करत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासन तणावात काम करत आहे. ही बाब सर्वांना ज्ञात आहे. परंतु, हे सर्व आम्हाला माहिती आहे. आम्ही येऊन बडबड करू. आम्हाला पण माहिती आहे, तुमच्यावर खूप ताण असून आपण दबावात काम करत आहात; पण घाबरू नका, आपले काम छान चालू आहे. आम्ही आपले स्वागतच करू. एवढेच नव्हे तर गरज पडल्यास आम्हाला पण आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत उभे असू, असा धीर आ. सुरेश धस यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना दिला. यावेळी अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. आय. व्ही. शिंदे, डॉ. राम देशपांडे, डॉ. सुधीर राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, आदींची उपस्थिती होती.
माणसं मेल्यावर रुग्णवाहिका येणार का?
आष्टी, पाटोदा तालुक्यांसाठी कार्डियाक रुग्णवाहिकेचा प्रस्ताव तयार केेलेला आहे. परंतु, तो अद्यापही पूर्ण करून जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलेला नाही. याच मुद्द्यावरून त्यांनी माहिती घेत प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. ही आपत्ती असून लवकर कसे मिळवायचे ते आम्ही बघू, तुम्ही फक्त पाठवा. आता नाहीतर माणसं मेल्यावर रुग्णवाहिका येणार का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी संताप व्यक्त केला.
राठोड, तुम्ही झटपट निर्णय घ्या
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कक्षात अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड हे देखील उपस्थित होते. जाता जाता त्यांनी डॉ. राठोड यांनाही चांगल्या कामाबद्दल शाबासकी दिली. परंतु, तुम्ही फक्त कामे प्रलंबित ठेवू नका. झटपट निर्णय घेऊन मोकळे होण्याचा सल्लाही आ. धस यांनी राठोड यांना दिला.
===Photopath===
060521\06_2_bed_6_06052021_14.jpeg
===Caption===
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्या कक्षात बोलताना आ.सुरेश धस. सोबत डॉ.सुखदेव राठोड, राजेंद्र मस्के आदी.