- मधुकर सिरसटकेज: पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने सोमवारी सायंकाळी करचुंडी शिवारात कारवाई करत तब्बल 16 लाख 54 हजार रुपयांचे गांजाचे पिक जप्त केले. याप्रकरणी चार शेतकऱ्यांच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
करचुंडी येथील काही शेतकऱ्यांनी शेतात गांजाची लागवड केल्याची गुप्तमाहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. यावरून सोमवारी सायंकाळी पाच वाजता पोलीस आणि महसूल पथकाने करचुंडी येथील शिवारातील शेतामध्ये छापा मारला. यावेळी कापसाच्या पिकात गांजाचे आंतरपीक घेतल्याचे पथकास आढळून आले. एकूण १६ लाख ५४ हजार रुपये किंमतीचा ३३० किलो गांजा पिक पथकाने जप्त केले. या प्रकरणी बाळासाहेब देवराव शिंदे ( 35), बंकट कल्याण शिंदे ( 35 ), डिगांबर आश्रुबा शिंदे ( 45 ), कुंडलीक निवृत्ती औटे यांच्या विरोधात पोलीस उप निरीक्षक पा.न.पाटील यांच्या फिर्यादीवरून.र.नं. 291 / 2023 कलम 20 एनडीपीएस कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूण पाच तास चालेली ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, व अपर पोलीस अधिक्षक कवीता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे, पोउपनि पा.न.पाटील, पोउपनि रोकडे, पोलीस हेडकॉन्सटेबल बालासाहेब डापकर, डोंगरे, क्षीरसागर, बळवंत, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोना पुंडे, पोअं शेळके, मुंडे, पोलीस अंमलदार शमीम पाशा, ढाकणे, क्षीरसारगर, राख,राऊत, होमगार्ड धन्वे, शेख, वरभाव, कुलकर्णी, वाघमारे, शेख, घरत, खंदारे यांच्या संयुक्त पथकाने केली.