नियमबाह्य वाहतुकीमुळे अपघाताचा धोका
अंबाजोगाई : नियमबाह्य व विनापरवाना वाहतुकीचे प्रमाण अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लॉकडाऊनसारखी स्थिती असतानाही वाहने रस्त्यावर सुसाट धावत आहेत. युवक मोठ्या प्रमाणात सुसाट वाहने चालवत आहेत. परिणामी लहान मोठे अपघात सातत्याने घडू लागले आहेत. अशा स्थितीत युवकांवर वाहन चालविताना पोलिसांनी निर्बंध घालावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोरगावकर यांनी केली आहे.
कलावंतांच्या समस्या सोडविण्याची मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्याचे कलावंतांचे मानधन गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. प्रलंबित मानधनासह वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन समिती गठित करण्याच्या मागणीसाठी संघटनेचा सातत्याने पुढाकार आहे. शासनाने कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये मानधन सुरू करावे, अशी मागणी कलावंत संघटनेने केली आहे. या मागणीकडे सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कलावंतांची उपेक्षा सुरू आहे.
लक्षणे असल्यास चाचणी करावी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्दी, ताप व खोकला, घसा खवखवणे, मळमळणे, चकरा येणे, आदी लक्षणे असणाऱ्या तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या संदिग्ध रुग्णांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, अंबाजोगाई शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या परिसरात कोरोना चाचणीसाठी स्वतंत्र केंद्र अस्तित्वात आहे. याठिकाणी चाचण्या करून घ्याव्यात असे आवाहन तहसीलदार विपिन पाटील यांनी केले आहे.
उन्हाळी वर्गाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
अंबाजोगाई : कोरोनाच्या संकटामुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे शाळेच्या वतीने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना दहावी उन्हाळी वर्गाला ऑनलाईन पद्धतीने प्रारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाला अनेक शाळांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन उपस्थितांचे प्रमाणही समाधानकारक आहे. नियमित शाळा होईपर्यंत ऑनलाईन अभ्यासावर भर दिला जाणार असल्याचे शाळांच्या वतीने सांगण्यात आले.