प्रभात बुडूख/
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना वैयक्तिक शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, सहकारी उत्पादन संस्था यांना प्रक्रिया उद्योगाकरिता अर्थसहाय्य देण्यासाठी २०२१ ते २०२५ या पाच वर्षाच्या कालावधीत ही योजना राबवली जाणार आहे. बीड जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हाधिका-यांनी या योजनेच्या लाभासाठी नवीन लाभार्थ्यांकरिता सीताफळ प्रक्रिया उद्योग निवडण्यात आला आहे.
मागील वर्षीपासून जिल्ह्यातून फक्त ८६ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी २३ प्रस्ताव बॅंकेकेड कर्जासाठी पाठवले आहेत. त्यापैकी २ प्रस्ताव बॅंकेकडून अपात्र ठरवण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गंत बॅंक कर्जाशी निगडित प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के ब्रॅँडिंग व बाजारपेठ सुविधांसाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाखाच्या मर्यादेत अनुदान मिळणार आहे.
...
कोणाला घेता येणार लाभ ?
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नत योजनेत वैयक्तिक शेतकरी, स्वंयसहाय्यत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उत्पादक संस्था आदी घटक योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना १० लाख रुपयांपर्यंत मदत करण्याची या योजनेत तरतूद आहे. या योजनेमुळे अनेकांना मदत होणार असल्याच सांगण्यात आले.
...
सीताफळाला चांगले दिवस
बीड जिल्ह्यात सिताफळासाठी पोषक वातावरण असल्याने उत्पादन देखील चांगले होते. या उद्योगाला या योजनेमुळे चालना मिळणार असल्याचे चित्र आहे. मात्र, अर्ज निकाली काढण्याची प्रक्रियेला उशिर होत असल्यानेत नवउद्योजकांना प्रशासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.
..
अर्ज जास्त, उद्दिष्ट कमी
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नत योजनेअंतर्गंत मागील वर्षी जिल्ह्यासाठी २७ इतके कमी उद्दिष्ट आले होते. त्या तुलनेत सिताफळावर प्रक्रिया करण्याचा उद्योग उभारण्यासाठी ८६ जणांनी अर्ज केले होेते. तालुकानिहाय देण्यात आलेले उद्दिष्ट हे इतर जिल्ह्याच्या तुलनेक कमी आहे. त्यामुळे शासनाने हे उद्दिष्ट वाढवावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
...
तालुकानिहाय उद्दिष्ट
बीड - ४
पाटोदा- १
आष्टी - ३
शिरुर कासार -१
माजलगाव २
गेवराई ४
वडवणी १
धारुर २
अंबाजोगाई ४
केज १
परळी ४.
....