वृक्षतोड थांबवावी
पाटोदा : पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही, अंमळनेर, वैद्यकिन्ही, निरगुडी, नायगाव या परिसरात सर्रासपणे अवैध वृक्षतोड होत असल्याचे दिसत आहे. वनविभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वृक्षमित्रांमधून केला जात आहे.
अशुद्ध पाणीपुरवठा
बीड : शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, पाईपलाईन फुटल्यामुळे ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा
माजलगाव : तालुक्यातील जायकोचीवाडी या गावचा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. जायकोचीवाडी ते खामगाव - पंढरपूर डांबरी रस्ता व पाणंद रस्ता अत्यंत बिकट झालेला आहे. या रस्त्याच्या समस्येबाबत निवेदनही दिले आहे. रस्त्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. परिणामी या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
बोंडअळीमुळे शेतकरी संकटात
अंबाजोगाई : तालुक्यात कापसाच्या पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक हातचे गेले. आता कापूस बहरात आला होता, तर कापसावर बऱ्याच ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापसावर हे नवीनच संकट आल्याने कापसाच्या उत्पादनात घट होऊ शकते. शेतकऱ्यांनी कृषितज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले जात आहे.
रस्त्याची दुर्दशा
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पंचायत समितीने लक्ष देण्याची मागणी आहे.
स्वच्छतागृह अस्वच्छ
बीड : शहरात नगरपालिकेकडून स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, स्वच्छता न केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने लक्ष घालून स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे; परंतु अद्यापही याकडे लक्ष दिले जात नाही.
महामार्गाचे काम अपूर्ण
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूर मार्गे मांजरसुंबा ते केज या राज्य महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याकडेला असलेल्या साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी आहे; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नदीत झुडपे वाढल्याने पात्र अरुंद
चौसाळा : बीड तालुक्यातील कुंभारी, सात्रापोत्रा, पालसिंगण या गावांतून वाहणाऱ्या गणेश नदीपात्रात झाडाझुडपांची संख्या वाढली आहे. तसेच वाळू उपशामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून, ओढ्यासारखे दिसत आहे. यामुळे नदीपात्रातील झाडेझुडपे कमी करून स्वच्छतेची मागणी केली जात आहे; परंतु अद्यापही याकडे दुर्लक्षच केले जात आहे.