बीड: धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर याने एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दादा खिंडकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर आज सकाळी साडेदहा वाजता तो बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आला. त्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी गंभीर आरोप करत खिंडकर हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोपी वाल्मीक कराड याच्या पेक्षाही मोठा गुन्हेगार असल्याचा आरोप केला आहे.
दादा खिंडकर याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून तो गावातील तीन ग्रामपंचायतींवर दहशत माजवत होता. याशिवाय, त्याने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या घरावर हल्ला करून त्यांच्या वाहनांची तोडफोड केल्याचा आरोपही आहे. या प्रकरणी आधीच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर सातपुते यांनी खिंडकरला वाल्मीक कराड पेक्षाही मोठा गुन्हेगार ठरवत, त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खिंडकरचा आका कोण?दादा खिंडकर हा माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या गटाचा समर्थक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमरसिंह पंडित यांनी खिंडकरची पाठराखण केली असल्याने, "खिंडकरच्या गुन्हेगारी कारवायांना पंडित यांचा आशीर्वाद आहे," असा आरोप सातपुते यांनी केला आहे.
व्हिडिओमुळे उघडकीस आलेली क्रूरतादादा खिंडकरचा एका तरुणाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओत ओमकार सातपुते याला अमानुषरित्या मारहाण केली जात असल्याचे स्पष्टपणे दिसते. ओमकार सातपुते हा परमेश्वर सातपुते यांचा चुलत भाऊ आहे. सध्या दादा खिंडकर पोलीस कोठडीत असून त्याच्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.