औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराची तीन वर्षांपूर्वी कचऱ्यामुळे देशभरातच नव्हे, तर विदेशातही नाचक्की झाली होती. कचरा प्रश्न महापालिकेच्या मुख्य अजेंड्यावर असताना राज्य शासनाकडूनही १०० टक्के आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे महापालिकेने दीड वर्षापूर्वी चिकलठाणा येथे ३०० मेट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. त्यापाठोपाठ आता पडेगाव येथील दीडशे मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प प्रयोगिक तत्त्वावर यशस्वीरीत्या सुरू करण्यात आला आहे. आता शहरात दररोज ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे, ही विशेष बाब होय.
नारेगाव भागातील नागरिकांनी तीन वर्षांपूर्वी कचऱ्याच्या विरोधात आंदोलन केले. त्यामुळे महापालिकेला शहरात कुठेच कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राऊंड मिळाले नाही. तब्बल चार महिने शहरातील संपूर्ण कचरा मुख्य रस्त्यांवर साचला होता. कचऱ्याचा हा गंभीर प्रश्न महाराष्ट्र शासनाने लक्ष घालून महापालिकेला १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून चिकलठाणा, पडेगाव आणि हर्सूल येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचे तीन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात चिकलठाणा येथील प्रकल्प अत्यंत यशस्वीपणे सुरू करण्यात आला. मागील दीड वर्षापासून या ठिकाणी दररोज १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.
पडेगाव येथील बांधकाम संपताच खाजगी कंत्राटदाराने यंत्रणा उभी करून थेट कचऱ्यावर प्रक्रिया करणे सुरू केले. मागील दोन महिन्यांपासून यशस्वीपणे ही प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. हर्सूल येथील प्रकल्पाला व्यापक प्रमाणात गती देण्यात आली असून, याठिकाणी बांधकाम सुरू केले आहे. या प्रकल्पात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हर्सूल येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प सुरू झाल्यास शहराची क्षमता ४५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची होईल.
बायो मिथेन प्रकल्प पूर्णत्वाकडेमहापालिकेने इंदूर शहराच्या धर्तीवर चौथा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पही पूर्ण करून ठेवला आहे. शहरात विविध हॉटेल्स आणि भाजीमंडईतील खराब पालेभाज्या आणून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायो मिथेन प्रकल्प नक्षत्रवाडी येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची पाहणी काही दिवसांपूर्वीच प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनीही केली होती. लवकरच या प्रकल्पातील ट्रायल घेण्याचे काम सुरू होणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.