लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या गारपिटीने जवळपास २०० हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज येथील महसूल विभागाचा अहवालावरुन दिसुन आहे. दोन दिवस उलटूनही अद्याप गारपीट झालेल्या गावात प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरुवात झालेली नसल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील गोदावरी पात्राशेजारील गावांसह अनेक गावांमध्ये वादळी वाºयासह गारांचा तडाखा बसला होता. त्यामुळे शेतांमध्ये उभे असलेले पीक अक्षरश: नेस्तनाबूत झाले. येथील महसुल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यातील सहापैकी दोन सर्कल हे गारांच्या तडाख्यात सापडले. मंगरुळ नं. २, हिवरा, रामपिंपळगांव, काळेगांव थडी, डुब्बाथडी, गव्हाणथडी, जदीदजवळा या गावांमधील ४४२ शेतक-यांच्या एकूण १९५ हेक्टर जमिनीमधील पिकांची पार वाताहत लागली आहे. यात पपई ५ हेक्टर, हरभरा ११६ हेक्टर, गहू ६९ हेक्टर, मोसंबी ५ हेक्टर असे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाच्या अहवालावरुन दिसतो.
गारपीट होवून दोन दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप पिकांचे पंचनामे करण्यासंदर्भात प्रशासनाने कुठलेही पाउल उचलल्याचे दिसून येत नाही. अद्याप तलाठी, मंडळाधिकारी यांना कसल्याही प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गारपिटीचे पंचनामे कधी होणार आणि आम्हाला कधी मदत मिळणार अशी शंका उपस्थित होत आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे सुरु करावेत, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.
वादळी तडाख्यात दीड एकर पपईची लागली वाताहतमंगरुळ नं. २ येथील शेतकरी रवींद्र राजेभाऊ बापमारे यांना केवळ दीड एकर जमीन आहे व त्यात त्यांनी पपईचे पीक घेतले होते. पपईच्या फळांचा सौदा देखील झाला होता. आठ दिवसांपासून व्यापारी आज माल नेतो उद्या नेतो असे म्हटल्यामुळे पपई शेतातच राहिली. परंतु आस्मानीने या शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यासाठी शेतकरी बापमारे याने जवळपास दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. आता हे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत शेतकरी असून, शासनाच्या मदतीशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही. तर काळेगाव येथील शेतकरी सुनिल गोविंदराव तौर याचे ६० एकरांवर असलेले हरभºयाचे पीक धुळीस मिळाले असून, त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ते हतबल झाले आहेत.