परळी : तालुक्यातील तडोळी येथील नागनाथ श्रीरंग सातभाई (वय ४०) या तरूण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे पिकांची नासधूस झाल्याने आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतात दोरीने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली.
गेल्या तीन वर्षांपासून पेरूच्या झाडांची लागवड केली होती. तीन वर्षापासून कृषी कार्यालयाकडून आजतागायत अनुदान त्यांना भेटले नाही. त्यातच आता अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेली पिके वाया गेली. जमिनीही वाहून गेल्या. नागनाथ यांचेही यात मोठे नुकसान झाले होते. तसेच आगाेदरच डोक्यावर एवढे कर्ज असल्याने फेडायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर होता. याच चिंतेतून त्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्यात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृतदेहाची परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरिय तपासणी करून तडोळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती. परंतू रात्री उशिरापर्यंत परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.