बीड : जयदत्तअण्णा क्षीरसागरांनी राष्ट्रवादीमध्ये मोठा वाईट काळ सोसला. त्यांना खूप काही सहन करावे लागले. याचा मी साक्षीदार आहे. जयदत्त आण्णांना दिलेला त्रास नियती परतफेड करत असल्याचे ते म्हणाले. सगळे बिघडलेले पुतणे पवारांनी आपल्या घरात घेतले आणि तीच सवय त्यांच्या घराला लागली, असा टोला आ.सुरेश धस यांनी शरद पवार, अजित पवार काका-पुतण्यांना लागावला.
रायमोहा येथे बीड मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पंकजा मुंडे यांची गुरुवारी जाहीर सभा झाली. यावेळी धस बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना सांगत होतो, क्षीरसागरांच्या घरामध्ये वाद होतील, असे चुकीचे करू नका, घर फुटेल... मात्र त्यांनी ऐकलं नाही. त्यांना क्षीरसागरांचे घर फोडायचेच होते. अखेर जयदत्त क्षीरसागर यांनी शिवबंधन बांधण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला. मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा क्षीरसागर बंधू माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले. प्रीतम मुंडे जेव्हा अडचणीत होत्या तेव्हा त्यांच्या पाठीशी जयदत्त क्षीरसागर खंबीरपणे उभे राहिले. आज पंकजाताई, खा.डॉ. प्रीतमताई आणि आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, जयदत्तअण्णा हे उद्याचे मंत्री आहेत, त्यांना संधी द्या, सुसंस्कृत माणसाच्या पाठीशी ताकद उभी करा असे आ. धस म्हणाले.धनुष्यबाण हाच रामबाण उपाय : जयदत्त क्षीरसागरबीड : ३० वर्षांपासून मी कोणताही दुजाभाव करत राजकारण केलं नाही. दोन समाजात तेढ होईल असं केलं नाही. विरोधकांची रुपं ही बेगडी असून ती तात्पुरती आहेत. ते रडतील, पडतील पण त्यांच्या या रूपाला थारा देऊ नका, असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी केले.घर फोडल्याने कुणाची घरं बांधली जात नाहीत, असं म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी पवारांवर निशाणा साधला. दुर्दैवाने पावसाचा महापूर बीडमध्ये आला नाही, पण माणसांचा महापूर पंकजातार्इंच्या दसरा मेळाव्याला आला होता. केंद्राच्या आणि राज्याच्या योजना अधिक गतिमान करायच्या असतील तर महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून द्यायचे आहे.पाच वर्ष इमानदारीने तुमची चाकरी केली आहे. तुमचा विश्वास सार्थ ठरवला आहे. पुन्हा एक संधी द्या, पुढचे पाच वर्षे इमाने इतबारे चाकरी करीन. आता मी नविन चिन्ह घेऊन आलोय. धनुष्यबाण हा रामबाण उपाय असून येणाऱ्या २१ तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबा आणि साथ द्या अशी साद घालत जयदत्त क्षीरसागर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, आ.सुरेश धस यांची समयोचित भाषणे झाली. प्रचारसभेस पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.