नगर रोडवर अस्ताव्यस्त पार्किंग
बीड : शहरातील नगर रोड भागात नागरिक बेशिस्त वाहने उभे करीत आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक खोळंबत आहे. विशेषत: या भागात शासकीय कार्यालये असल्याने या परिसरात सतत वाहतूक असते. त्याच दरम्यान कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने रस्ता वाहतुकीस अरुंद होत आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी या वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज आहे.
सदोष वजनकाट्यांद्वारे ग्राहकांची लूट
अंबाजोगाई : चिल्लर व ठोक विक्रीच्या व्यवसायांमध्ये वापरण्यात येत असलेले बरेचसे वजनकाटे सदोष आहेत. परिणामी विक्रेत्यांकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. दुकानदार भाव कमी दर्शवून काटा मारून ग्राहकांची लूट करीत आहेत. यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी व ती यंत्रणा वर्षानुवर्षे इकडे फिरकत नाही. त्याचा मोठा गैरफायदा घेऊन व्यापारी ग्राहकांची लूट करीत आहेत.
तहसील कार्यालयात दलालांचा सुळसुळाट
अंबाजोगाई : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते. मात्र, अंबाजोगाई तहसील कार्यालयात मात्र, दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात. नागरिक स्वत: एखादे प्रमाणपत्र काढण्यासाठी गेले तर तहसील कार्यालयात काम करणारे कर्मचारी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात.