अंबाजोगाई (बीड) : खाजगी शिकवणींच्या परिसरातील वाढते छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथकाने मोहीम उघडली असून रविवारी एकाच दिवसात १४ जणांवर प्रतिबंधक तर ६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यासोबतच खाजगी शिकवणीच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. खाजगी शिकवणी परिसरात मुख्यत्वे आनंद नगर भागात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार गंभीर स्वरूप धारण करू लागले आहेत. मागील आठवड्यात यातूनच विनयभंग आणि हाणामारीचे प्रकार घडले. अश्या घटनांमुळे मुलींमध्ये आणि पालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे हि परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकाने कंबर कसली असून शाळा, महाविद्यालये आणि खाजगी क्लासेसच्या परिसरातून गस्त घालणे सुरु केले आहे. पोलीस उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड यांच्याकडे या पथकाचे नेतृत्व असून पथकात महिला पोलीस गीते, वाहतूक पोलीस सोपने, पुरी, घोळवे यांचा समावेश आहे.
रविवारी या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी १४ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तर ९ जणांना न्यायालयापुढे हजर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली. बेफाम दुचाकीस्वारांवरही या पथकाचे लक्ष असून ट्रिपलसीट मोटारसायकल चालवणाऱ्या ६ महाविद्यालयीन युवकांवर दंडात्मक कारवाई करून बाराशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
खाजगी शिकवणी चालकांना सीसीटीव्हीची सक्ती खाजगी शिकवणी परिसरात घडणाऱ्या अप्रिय गोष्टींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेत शहरातील सर्व खाजगी क्लासचालकांची शुक्रवारी पोलीस ठाण्यात बैठक घेतली. यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली.यावेळी पोलिसांनी खाजगी शिकवणी चालकांना शिकवणीच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्याची सक्ती केली.
साध्या वेशातील पोलिसांची गस्त खाजगी क्लास परिसरातून दामिनी पथकासोबतच साध्या वेशातील पोलीसही गस्त घालणार आहेत. मोटारसायकल पेट्रोलिंग देखील करण्यात येणार आहे. तरीदेखील कुठे काही अप्रिय घटना होत असल्याचे आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.”- सोमनाथ गीते, पोलीस निरीक्षक, अंबाजोगाई शहर टवाळखोरांची गय केली जाणार नाही विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी कायद्याचे पालन करावे. विद्यार्थिनींना आणि महिलांना त्रास होईल असे वर्तन करू नये. रहदारीचे नियम पाळावेत. जर कोणी युवक हुल्लडबाजी करताना पथकास आढळून आला तर त्याची गय केली जाणार नाही.पालकांनीही आपल्या पाल्याच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवावे. मदतीसाठी दामिनी पथकाच्या ८६६९३०३३०३ या क्रमांकावर संपर्क साधावा.- देवकन्या मैंदाड, पोलीस उपनिरीक्षक