लोकमत न्यूज नेटवर्कबीड : छेडछाडीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची स्थापना केली. आता या पथकांना लोकसहभागातून १२ दुचाकी दिल्या जाणार आहेत. सकाळी उजाडल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत दामिनी पथक जिल्हाभर गस्त घालून रोडरोमिओंना चोप देणार आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या संकल्पनेतील या उपक्रमास ७ फेबु्रवारी रोजी सुरूवात होणार आहे.शाळा, महाविद्यालयात जाताना रस्त्यावर उभा राहून किंवा पाठलाग करून रोडरोमिओ मुलींची छेड काढतात. तसेच रात्री, अपरात्री एकटी महिला, मुलगी पाहून तिला टाँट मारणे, अश्लील भाषा वापरणे, छेड काढण्यासारखे प्रकार केले जातात. हाच धागा पकडून जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची नियूक्ती केली. जिल्हाभर जनजागृतीसह छेड काढणाऱ्या रोमिओंना पकडून चोप दिला. आता यामध्ये आणखी सुधारणा व्हावी, मुलींमध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी प्रत्येक पथकाला एक दुचाकी दिली जाणार आहे. याच दुचाकीवरून पथकाचे कर्मचारी सर्वत्र गस्त घालणार आहेत. यामुळे छेडछाडीचे प्रमाण कमी होऊन रोमिओंमध्ये वचक निर्माण होऊ शकतो. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर हे या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच पोउपनि भारत माने हे पथकांचा आढावा घेतील. हलगर्जीपणा, कामचुकारपणा, चुकीची कारवाई होणार नाही, यासाठी काळजी घेण्याच्या सुचनाही दिल्या जाणार आहेत. ७ फेब्रुवारी रोजी अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे, पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या उपस्थितीत याला सुरूवात होईल.
छेडछाड रोखण्यासाठी ‘दामिनी’ची दुचाकीवरून गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 1:17 AM