बीड : ‘बिंदुसरा धरणाची सुरक्षा धोक्यात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभाग खडबडून जागा झाला आणि भिंतीवरील झाडंझुडपं काढण्याचे काम सुरु केले. मात्र, धरणाच्या भिंतीवर पोकलेनच्या सहाय्याने झाडं काढल्यामुळे धोका अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिचिंगचे दगड उखडली जात असल्याचे पाली ग्रामस्थांनी सांगितले.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या धरणाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या वाढली आहे. गत वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे धरणात पाणीसाठा ४५ ते ५० टक्के इतका आहे. त्यामुळे मोठ्या पावसात धरण भरू शकते, पावसाळ््यापुर्वी धरणांच्या भिंतीवरील झाडं-झुडपं काढण्याचे काम पाटबंधारे विभागाकडून अपेक्षित होते. मात्र, त्यांनी पूर्णपणे दुर्लंक्ष केल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून कार्यवाही सुरु झाली. मात्र, धरणाच्या भिंतीवर पोकलेनने झाडं काढण्याचे कामं सुरु केल्याचे कार्यकारी अभियंता आ.बी. करपे यांनी सांगितले.
प्रत्यक्षात मोठ्या झाडांची मुळं ही भिंतीत खोलवर गेल्यामुळे ती काढताना काळजी घेणे गरजेचे होते. मात्र, मशीनच्या सहाय्याने काढल्यामुळे भिंतीला मोठे खड्डेपडले आहेत. त्यामुळे मोठ्या पावसात धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. झाडं वाढल्यानंतर वेळोवेळी साफसफाई करणे गरजेचे असताना, संबंधित विभागाकडून दुर्लंक्ष झाल्याचे दिसून येते. बिंदुसरा धरणावर मशीनच्या सहाय्याने कामं न करता कामगारांच्या सहाय्याने झाडं झुडपं काढणे गरजेचे होते. तसे न झाल्यामुळे भिंतीवरील दगडं निघत आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी भिंतीत मुरल्याने पुन्हा धोका वाढू शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
साफसफाईदरम्यान दगड निघतच असतात, त्याचे सर्वेक्षण पावसाळ्यानंतर केले जाते. पावसाळ्यापूर्वीदेखील सर्वेक्षण झाले होते. - आर.बी. करपे कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग ३