बीड : मुंबई येथील बेस्ट उपक्रमासाठी बीड विभागातील चालक, वाहकांना रोटेशन प्रमाणे पाठविले जात आहे. ते परतल्यावर त्यांची कोरोना चाचणी केली असता आतार्यंत तब्बल १९० लोकांना बाधा झाल्याचे उघड झाले आहे. हा उपक्रम सध्या तरी कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असून आता पुन्हा त्यांना मुंबईला पाठवू नये, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने महाव्यवस्थापकांकडे केली आहे.
मुंबईतील बेस्ट उपक्रमासाठी बीड विभागातून २५ ऑक्टोबरपासून प्रत्येक आठवड्याला ४६० कर्मचारी पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत तब्बल १३५० कर्मचारी पाठविले आहेत. कर्तव्य बजावून ते परतल्यावर त्यांची कोरोना चाचणी केली असता तब्बल १९० कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. परत येताना व आल्यावर त्यांचा कुटुंब, नातेवाईक, प्रवासी यांच्याशी संपर्क येत असल्याने संसर्ग वाढण्याची भीती आहे. पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातही याबाबत भीती आहे.
दरम्यान, जिल्यात दोन हजार कर्मचारी असून त्यांचे ३० नोव्हेंबरअखेरपर्यंत कर्तव्य बजावून पूर्ण होत आहे. यातील बहुतांश कर्मचारी हे वयोवृद्ध असल्याने त्यांना कोरोनाचा धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून बीड विभागातील एकाही कर्मचाऱ्याला पुन्हा या उपक्रमासाठी पाठवू नये, अशी मागणी कामगार सेनेने केली आहे.
मुंबई बेस्ट उपक्रमासाठी कर्मचारी पाठविले जात आहेत. आल्यावर चाचणी केली जाते. पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना उपचारासाठी सेंटरमध्ये तर निगेटिव्ह असलेल्यांना निर्देशाप्रमाणे ७२ तास क्वारंटाईन ठेवले जात आहे. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे कर्मचारी पाठविले जात आहेत. -भगवान जगनाेर, विभाग नियंत्रक, रापम, बीड
मुंबई येथे जाऊन आलेल्या जवळपास १९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. यापुढे तरी त्यांना पुन्हा या उपक्रमासाठी पाठवू नये. सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती आहे.-राहुल बहिर, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, बीड