लोकमत न्यूज नेटवर्कबीड : व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने मागील तीन-चार पिढ्यांपासून बीड जिल्ह्यात स्थायिक झालेल्या राजस्थानी परिवारासाठी युवा माहेश्वरीने शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगळावेगळा उपक्रम आयोजित केला आहे. राजस्थानीसमाजातील ४५ पेक्षा जास्त कुलदेवतांचे दर्शन भाविकांना होणार आहे.राजस्थानी समाज बांधव व्यवसाय, व्यापार व अन्य कारणाने महाराष्ट्रासह जगभरात मिसळून गेले आहेत. तेथील रीतिरिवाज, परंपरा उत्सवात एकरूप झाले आहेत. हे करीत असताना मातृभूमी आणि कुलदेवतांचे स्मरण नेहमी होत असते.कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कुलदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यावे लागतात. नवरात्रीमध्ये कुलदेवतेचे, मातेचे दर्शन महत्त्वाचे असते. परंतु बीडपासून जवळपास एक हजार किलोमीटरपर्यंत जाणे शक्य नसते. हे लक्षात घेऊन येथील युवा माहेश्वरीने बीड शहरातच राजस्थानी समाजातील समस्त कुलदेवींचे दर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. २९ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत कुलदेवतांचे दर्शन घेता येणार आहे. २९ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता महादेव महाराज चाकरवाडीकर, समाधान महाराज शर्मा (केज), अमृत महाराज जोशी (नवगण राजुरी) नवनाथ महाराज (गोरक्षनाथ टेकडी), नारायण महाराज पारीख (बीड) यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या उपक्रमासाठी माहेश्वरी समाज ट्रस्ट अकोला, सकल जैन समाज, विप्र समाज, माँ वैष्णो पॅलेस तसेच माहेश्वरी समाजाने सहकार्य केले आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन युवा माहेश्वरीचे अध्यक्ष पंकज धूत, उपाध्यक्ष पंकज भुतडा, सचिव महेश लड्डा, प्रोजेक्ट चेअरमन कमलेश रांदड, समन्वयक मयूर काबरा तसेच राजेश्वर तापडिया, संतोष तोष्णीवाल, अमित मंत्री, अमर सारडा, मयूर कासट, सचिन लड्डा, नीरज सारडा, गोपाल कासट, संकेत टवाणी, हेमंत बियाणी, गौरव सारडा, अभिजीत दोडे, श्रीकांत बियाणी, विजय डागा, शुभम सिकची, अमित बाहेती आदींनी केले आहे.
युवा माहेश्वरीचे राजस्थानी कुलदेवता दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:27 PM