लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा, तर श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचा दसरा मेळावा शनिवारी होत आहे. नारायणगडावर पहिल्यांदाच लाखोंच्या संख्येने लोक जमा होणार आहेत, तर सावरगावघाट येथेही पहिल्यांदाच धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे बहीण-भाऊ एकत्रित येणार आहेत. जरांगेंचा मेळावा मुंडेंसाठी आव्हान असणार आहे. यात कोण काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सावरगाव घाट या राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगावी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा सुरू केला. त्याची परंपरा आजही कायम आहे. तर आता मनोज जरांगे-पाटील पहिल्यांदाच श्रीक्षेत्र नारायणगडावर दसरा मेळावा घेत आहेत.
मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर कोण?
मनोज जरांगे- पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. आचारसंहितेच्या अगोदर आरक्षण न दिल्यास उमेदवार पाडणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. लोकसभेलाही त्यांनी नाव न घेता ‘जे आरक्षणाच्या विरोधात त्याला पाडा’, असे विधान केले होते. त्यानंतर याच निवडणूक प्रचारात पंकजा मुंडे यांनी आंदोलनाबाबत विधान केले होते. यावर जरांगेंनी त्यांचा समाचार घेतला होता. याचा फटका पंकजा यांना लोकसभेत बसला व पराभव झाला. त्या निवडणुकीत जातीय राजकारण झाले होते. आता यावेळी जरांगे कोणावर निशाणा साधणार? याकडे लक्ष लागले आहे.
सरसंघचालक काय बोलणार? संघाचा शताब्दी वर्षात प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या स्थापनेला ९९ वर्षे पूर्ण झाली असून, विजयादशमीला शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका व आगामी विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात, याकडे लक्ष असेल.