- नितीन कांबळे कडा (बीड): गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेली नगर-बीड-परळी रेल्वेचे काम आता आष्टीपर्यंत पूर्ण झाले आहे. यावर तीन वेळा रेल्वे इंजिनची चाचणी झाली. एवढेच नाहीतर हायस्पीड रेल्वेची चाचणी झाली. मात्र, त्यानंतर ७ मे ला रेल्वे नियमित धावणार असल्याची केवळ घोषणाच ठरली आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई येथील एका कार्यक्रमात अहमदनगर ते आष्टी रेल्वे ७ मे ला धावणार असल्याचे जाहीर केले होते.
मुंबई येथे २९ एप्रिल रोजी नगर-आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावरील रेल्वे मार्ग ७ मेला सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले होते. रेल्वे राज्यमंत्र्यानी अधिकृत घोषणा करून देखील रेल्वे धावली नसल्याने बीडकरांची निराशा झाली आहे. रेल्वे नेमकी कोणत्या दिवशी धावणार याची अधिकृत माहिती ना जिल्हा प्रशासनाकडून दिली जातेय ना रेल्वे लोहमार्ग अधिकाऱ्यांकडून. त्यामुळे बीडकरांची स्वप्नपूर्ती कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अनेक वेळा रेल्वे धावणार असल्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आता नवीन तारीख कोणती असेल याबाबत रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप या मार्गावर रेल्वे धावण्यासंदर्भात कसलेच नियोजन नसल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर दिली.