बीड : सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला. त्यामुळे त्यांना तेव्हा अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यांनी तो न भरल्याने सुनेसह मुलाला जात पंचायतमध्ये बोलावले. त्यांनीही असमर्थता दर्शविल्याने पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. तसेच पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारू, अशा धमक्याही दिल्या. हा प्रकार २२ सप्टेंबर २०२४ रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. अखेर नऊ जणांविरोधात आष्टी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतचा मुद्दा समोर आला आहे.
मालन शिवाजी फुलमाळी (वय ३२, रा. कडा कारखाना, ता. आष्टी) यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेम विवाह केला होता. त्यांची जात नंदीवाले (तीरमाली) अशी आहे. तेव्हा जात पंचायत बसविण्यात आली. यामध्ये नरसू फुलमाळी यांना २ लााख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. परंतु, अनेक वर्षे उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी शिवाजी पालवे (रा. धनगरवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांच्या मार्फत जात पंचायतमध्ये मालन यांना बोलावण्यात आले. ही पंचायत आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे होती. त्याप्रमाणे त्या पती शिवाजी, मुलांसह तेथे पोहचल्या. या ठिकाणी पंचांसह समाजाचे ८०० ते ९०० लोक अगोदरच जमलेले होते. त्यादिवशी निर्णय झाला नाही.
त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी पुन्हा जात पंचायत बोलावली. सकाळी ११ पंचांसमारे उभे केले. सासऱ्याने दंड भरला नाही म्हणून तुम्ही भरा, असे सांगितले. तुम्ही दंड भरला नाहीत तर समाजातून तुम्हालाही बहिष्कृत करू, तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू, अशा धमक्या दिल्या. शेवटी दंड भरू न शकल्याने पंचांनी मालन यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. त्यामुळे मालन यांनी आष्टी पाेलिस ठाणे गाठत तक्रार केली. त्यावरून २५ सप्टेंबर रोजी पहाटे दीड वाजता नऊ जणांविरोधात सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध व निवारण) अधिनियम २०१६ मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण ४, ५, ६ तसेच बीएनएस १८९ (२), ३५१ (२) (३), ३५२ अशा कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींमध्ये यांचा समावेशगंगाधर बाबू पालवे (रा. धनगरवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर), उत्तम हनुमंत फुलमाळी (रा. जेवून आयबत्ती, ता. नेवासा, जि. अहमदनगर), गंगा गंगाराम फुसमाळी (रा. पाटसरा, ता. आष्टी), चिन्नू साहेबराव फुल माळी (रा. डोईठाण, ता. आष्टी), सुभाष फुलमाळी (रा. शनी शिंगणापूर, जि. अहमदनगर), बाबुराव साहेबराव फुलमाळी (रा. निमगाव गांगरडा, ता. कर्जत, जि. अहमदनगर), शेटीबा रामा काकडे (रा. वाळकी, जि. अहमदनगर), सयाजी सायबा फुलमाळी (रा. पिंपळनेर, जि. बीड), गुलाब पालवे (रा. धनगडवाडी, जि. अहमदनगर) यांच्यासह इतर पंचांचा आरोपींत समावेश आहे.