- नितीन कांबळेकडा - कुटुंब शेतात असताना बंद घराचे कुलूप तोडून सहा तोळे सोन्यासह पन्नास हजार रूपये रोख, असा २ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना आठ दिवसापूर्वी कर्हेवडगाव येथे घडली होती. आष्टी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने गुरूवारी रात्रीच्या दरम्यान चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरट्याने कर्हेवडगाव येथील चोरीसह इतर दोन ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
आष्टी तालुक्यातील कर्हेवडगाव येथील खंडू हरिभाऊ सांगळे याच्या कुटुंबातील सदस्य २८ ऑगस्ट रोजी सकाळी कांदा लागवडीसाठी शेतात गेले असता अज्ञात चोरट्याने बंद घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत सहा तोळे सोन्यासह रोख ५० हजार रूपये असा २ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घटनास्थळी भेट देत पाहणी करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.त्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,सदरची घरफोडी करणारा रामेश्वर जंगल्या भोसले वय वर्ष २४ रा.पांडेगव्हाण ता.आष्टी हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती मिळताच तिथे जाऊन त्याला ताब्यात घेत विचारपूस केल्यानंतर त्याने सदरच्या घरफोडीसह आष्टी ठाणे हद्दीत अन्य दोन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.आरोपीला आष्टी पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलिस हवालदार अशोक दुबाले,दिपक खांडेकर, पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड, बाळू सानप,अर्जुन यादव, नामदेव उगले,सुनिल राठोड,यांनी केली.