बीड: दिवसा घरफाेडी करणाऱ्या लातूरच्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. ही कारवाई २८ जानेवारी राेजी चौसाळा परिसरात करण्यात आली. यामध्ये चोरट्याकडून तब्बल तीन लाख रूपयांचे दागिने परत मिळविण्यात पाेलिसांना यश आले आहे. दरम्यान, हा चाेरटा बंद घरांवर विशेष नजर ठेवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
राजाराम उर्फ बबन धोंडिराम बुधवाडे (वय ३२ रा.बाभळगाव जि.लातुर) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. बीड तालुक्यातील नेकनूर व चौसाळा पोलिस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. त्याप्रमाणे एलसीबीचे पोलस निरीक्षक संतोष साबळे यांच्या पथकाला राजाराम बुधवाडे याची माहिती मिळाली. चौसाळा परिसरात त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने दिवसा घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तब्बल ३ लाख रूपयांची दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. त्याला आता नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान, राजाराम हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात बीड आणि लातूर जिल्ह्यात जवळपास १३ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या टीमने केली.