अंबाजोगाई : पोलीस असल्याची बतावणी करत तीन भामट्यांनी तपासणी करण्याच्या बहाण्याने ट्रकला अडविले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत ते भामटे ट्रक मधील ८६ हजार रुपये घेऊन पसार झाले. ही घटना रविवारी (दि.२८) दुपारी अंबासाखर उड्डाणपुलाच्या जवळ घडली. मागील महिन्यातच लोखंडी सावरगाव जवळ लातूरच्या व्यापाऱ्याच्या चालत्या कारवरील बॅग लंपास करून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लुटला होता. त्या चोरीचा तपास प्रलंबित असतानाच रविवारी भरदुपारी १२ वाजता पुन्हा लुटीची घटना घडल्याने अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.
अधिक माहिती अशी कि, बनवारीलाल दुर्गाप्रसाद शर्मा (रा. शिबीपुरी, आग्रा, उत्तर प्रदेश) हा ट्रकचालक रविवारी त्याच्या ट्रकमध्ये (आरजे ११ जीव्ही २०३७) लातूरच्या व्यापाऱ्याचा माल घेऊन उत्तर प्रदेशात जाण्यासाठी निघाला होता. दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्याचा ट्रक लातूर - लोखंडी सावरगाव मार्गावर अंबासाखर उड्डाणपुलाच्या पुढे आला असता पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ट्रकला अडविले. आम्ही पोलीस आहोत, ट्रकची झडती घ्यायची आहे अशी बतावणी करून त्यांनी चालकासह त्याचा मुलगा आणि हेल्परला खाली उतरविले. त्यानंतर ट्रकच्या केबिनमध्ये सीटच्या पाठीमागे पेटीत ठेवलेले रोख ८६ हजार रुपये काढून घेतले. याबाबत कुठे वाच्यता केल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी देऊन ते तिघेही पसार झाले. याप्रकरणी ट्रकचालक बनवारीलाल याच्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिन्यातील दुसरी घटना मागील महिन्यात लग्नाहून परतणाऱ्या गटागट कुटुंबियांची कार रात्री ११ वाजता लोखंडी सावरगाव जवळील कळंब टी रस्त्याजवळ आली असता चोरट्यांनी कारच्यावर बांधलेल्या बॅगा काढून घेत तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या चोरीचा तपास अद्याप प्रलंबित आहे. रविवारी दुपारी पुन्हा ट्रक चालकाला लुटण्यात आले. भर वस्तीजवळ दिवसाढवळ्या होणाऱ्या लुटीच्या घटनांनी चोरटे निर्ढावल्याचे दिसून येत आहे.