बीड : शहरातील वीर हॉस्पिटलमध्ये पुरुष जातीचे नवजात मयत अर्भक गुरुवारी सायंकाळी वाहन पार्किंगमधील शौचालयात उघड्यावर आढळून आले. याची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ तपासचक्रे फिरविण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत याचा शोध लागलेला नव्हता. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शहरातील जालना रोडवर वीर हॉस्पिटल आहे. येथे सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मेडिकलवर कामाला असणारे ओमप्रकाश शेटे हे वाहन पार्किंगमधील सार्वजनिक शौचालयात गेले. त्यांना येथे एक अर्भक दिसले. त्यांनी ही माहिती डॉ.संजय वीर यांना दिली. त्यांनी तत्काळ शहर पोलिसांना माहिती दिली. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसी कॅमेरे तपासण्यासह संशयित लोकांची यादी ताब्यात घेतली, तसेच सर्व स्टाफ, परिसरातील लोकांची माहिती घेणे सुरू केले. याबरोबरच ज्या लोकांवर संशय आहे, त्यांच्या शोधासाठी पथकेही रवाना केल्याचे सांगण्यात आले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महिलेवर संशय; काय घडले हॉस्पिटलमध्ये
साधारण ३० वय असलेली महिला बुधवारी रात्री ६.५७ वाजता वीर हॉस्पिटलमध्ये आली. तिला डॉ.वीर यांनी तपासले. त्यानंतर लघवी तपासणी करण्यास सांगितले. त्यात आजाराचे निदान झाल्याने सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. तिने सोनोग्राफी न करताच शौचालयात गेली. ७.१९.३४ मिनिटांनी ती शौचालयात गेली होती. ७.३३.३० मिनिटानंतर ती परत आली. आल्यानंतर प्रसूती झाल्यानंतर माता जसे हावभाव करते तसे कमरेवर हात देणे, शांत चालणे असे तीही करत होती. सुरुवातीला तिला चालताही येत नव्हते; परंतु शौचालयातून आल्यावर ती स्वत: पहिल्या मजल्यावर चालत गेली. यावेळी तिला कसलाही त्रास नव्हता. सुरुवातीला सोनोग्राफी न करणाऱ्या या महिलेला अर्ज भरलेला असल्याने पुन्हा सोनोग्राफी करायला पाठविले. येथे तिच्या अहवालात गर्भाचा मोठा गोळा असल्याचे समजले. यावेळी तिच्यासमवेत आणखी एक महिला आणि दोन पुरुष होते. या सर्वांचे संभाषण हिंदीतून होते आणि त्यांनी शाहू नगर, बीड असा पत्ता सांगितल्याचे डॉ. कविता व डॉ.संजय वीर म्हणाले.
कोट
माहिती मिळताच दाखल झालोत. सर्व पंचनामा सुरू आहे. परिसरातील लोकांची चौकशीही केली आहे. संशय असलेल्या महिलेने दिलेल्या पत्त्यावर तपासणीसाठी पथक पाठविले आहे. कॅमेरेही तपासले आहेत. याचा तपास लवकरच लावू.
रवी सानप,
पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे बीड.