लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : आष्टी तालुक्यातील सर्व तलाव जोरदार पावसाने ओव्हर फ्लो झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाने सूचना देऊनही तलावात जीव धोक्यात घालून काही तरुण पोहण्यासाठी उड्या घेत आहेत. ही स्टंटबाजी जीवघेणी ठरू शकते. दरम्यान, या ठिकाणी कोणी जाऊ नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आष्टी प्रशासनाने दिला आहे.
आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील कडी तलाव सोमवारी पहाटे ओव्हर फ्लो झाला. त्याच अगोदर तालुक्यातील अनेक तलावदेखील ओव्हर फ्लो झाल्याने प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा दिला आहे. तरीदेखील याची कसलीच भीती न बाळगता दादेगाव येथील तलावात तीन तरुण जीव धोक्यात घालून पोहण्याचा आनंद घेताना एका व्हिडिओ क्लिपमधून दिसत आहेत. या तरुणांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.
ओव्हर फ्लो झालेल्या तलावाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून या ठिकाणी जाण्यास मज्जाव करावा. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसंग्राम तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
...
तलाव परिसरातील प्रतिबंधक क्षेत्रात लोकांनी जाऊ नये. पाण्याचा ओघ वाढत आहे. आपली काळजी आपणच घ्यायला पाहिजे. यासाठी जनजागृती केली जात असल्याचे लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता देवेंद्र लोहकरे यांनी सांगितले.
...
याप्रकरणी गावोगावी दवंडी द्यायला लावली आहे. कोणत्याही धरणाच्या सांडवा परिसरात गेल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तातडीची बैठक तहसील कार्यालयात बोलावली आहे.
-प्रदीप पांडुळे,नायब तहसीलदार, आष्टी
060921\screenshot_20210906-091344_whatsapp_14.jpg
आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील ओव्हरफ्लो झालेल्या तलावात जीव धोक्यात घालून पोहण्याचा स्टंट करताना तरूण.