- नितीन कांबळे कडा ( बीड ) : सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन मोठमोठे तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. अद्यापही पाण्याचा ओघ सुरूच असल्याने नागरिकांनी जिव धोक्यात घालू नये अशा सुचना आपत्ती व्यवस्थापनाने देऊनही काही तरुण ओव्हर फ्लो तलावात पोहण्यासाठी उड्या घेत असल्याचे चित्र दादेगांव येथील कडी तलावात दिसत आहे. हा स्टंट नक्कीच जिवघेणा ठरू शकतो यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यायला अशी मागणी जागरूक ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यातील अनेक तलाव ओव्हर फ्लो झाल्याने प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा दिला आहे. तरी देखील याची कसलीच भिती न बाळगता दादेगांव येथील तलाव भरून वाहत असताना काही तरूणांनी या तलावात आपला जिव धोक्यात पोहण्यासाठी उड्या घेतल्या. उड्या घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तरुणांची ही जीवघेणी स्टंटबाजी जीवावर बेतणारी ठरू शकते. तालुक्यातील बेलगाव येथील तलावाच्या सांडव्यात पडून दोन वर्षांपूर्वी दोघांचा बळी गेला होता. अशाच प्रकारे एखाद्याचा जिव गेला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न या निमित्ताने ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
तालुक्यातील ओव्हर फ्लो झालेल्या तलावाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून प्रतिबंधक ठिकाणी जाण्यास मज्जाव करावा तसेच याचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे. तलाव परिसरातील प्रतिबंधक क्षेत्रात लोकांनी जाऊ नये पाण्याचा ओघ वाढत आहे. आपली काळजी आपणच घ्यायला पाहिजे. यासाठी जनजागृती केली जात असल्याचे लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता देवेंद्र लोहकरे यांनी सांगितले.
हेही वाचा - ह्रदयद्रावक ! बुडणारा मुलगा वाचला; पण त्याला वाचविणारे तिघे बुडाले
तलावावर सुरक्षा व्यवस्था शून्य कडी प्रकल्प भरून वाहत आहे. या ठिकाणी लहु पाटबंधारे विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी असणे बंधनकारक आहे. मात्र, कर्मचाऱ्याचे पद रिक्त असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे तलावाच्या सुरक्षेसाठी व नागरिकांना प्रतिबंध करण्यासाठी कोणीच नसल्याचे दिसून आले.
गावात दवंडी द्यायला लावली असून सांडवा परिसरात गेल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील. त्याच बरोबर आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तातडीची बैठक तहसील कार्यालयात बोलावली आहे.- प्रदिप पांडुळे, नायब तहसिलदार
हेही वाचा - लक्ष ठेवायला सांगितले अन् त्यानेच केला घात; मुकुंदवाडीत पाच वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग