बीड : गेल्या चाळीस वर्षापासून देशात सांप्रदायिक आणि नारदीय कीर्तन सेवा देणारे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी (वय ५७ वर्षे) यांचे २९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्क्याने देहावसान झाले. भरतबुवांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नात, दोन भाऊ, भावजई आदी परिवार आहे.
वारकरी सांप्रदायाची पताका गेल्या अनेक वर्षापासून एकनिष्ठपणे सांभाळणाºया भरतबुवांनी बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणचा कीर्तन महोत्सव देशभरात पोहचवला. मागील सोळा वर्षापासून ते या महोत्सवाचे उत्कृष्ट संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. भरतबुवांच्या निधनाने सांप्रदायीक चळवळीची मोठी हानी झाली आहे.
संत चरित्राचे गाढे अभ्यासक असलेले रामदासी यांना शनिवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी करु न त्यांना मृत घोषित केले. भरतबुवांच्या अकाली निधनाची वार्ता वाºयासारखी शहरभर पसरली अनेकांना त्यांच्या निधनाने धक्का बसला. माहिती मिळताच जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व क्षेत्रातील नागरिकांनी, प्रतिष्ठितांनी गर्दी केली होती. भरतबुवा रामदासी हे मुळचे रुई धानोरा (ता.गेवराई) येथील रहिवासी असून बीड शहरातील सराफा रोडवरील राममंदिर गल्लीत ते वास्तव्यास होते. गेल्या चाळीस वर्षापासून देशभरात सांप्रदायिक, वारकरी आणि नारदीय कीर्तन सेवा केली आहे. बीडचे नाव सांप्रदायिक चळवळीच्या माध्यमातून देशाच्या पटलावर पोहचवण्यात भरतबुवांचा सिंहाचा वाटा होता.रविवारी सकाळी अंत्यसंस्कार
भरतबुवा रामदासी यांच्या पार्थिवावर 1 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील मोंढा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी सराफा लाईन, राम मंदिर गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.
लोकमत.कॉम साठी भरतबुवा लिहायचे अध्यात्मलोकमत आॅनलाईनवर हभप भारतबुवा रामदासी हे नियमित आठवड्याला अध्यात्म या सदरातून समाजप्रबोधन करत असत. अतीशय स्पष्ट, सुलभ भाषेत दाखले देत ते अंधश्रद्धा, वाईट गोष्टीवर घणाघाती लिहित असत. त्यांनी लोकमत आॅनलाईनवर 55 लेख लिहिले. शेवटचा लेख 22 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला. ते नेहमी दोन लेख अॅडव्हान्समध्ये देत असत. यावेळी मात्र त्यांनी 22 फेब्रुवारीपर्यंतचाच लेख दिला. त्यांचे लिखाण असो की कीर्तन, प्रवचन, त्यास वाचकवर्ग, श्रोतावर्ग होता. लिखाण आणि वाणीवर त्यांचे प्रभूत्व होते.