बीड : येथील मोमीनपुरा भागात जागेच्या किरायावरून दोन गटांत मोठा वाद झाला होता. यावेळी तुंबळ हाणामारी झाली होती. या प्रकरणातील आरोपीचा पोलीस कोठडीत असताना २५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, आरोपीच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला.
मोमीनपुरा येथील हाणामारीप्रकरणी पेठ बीड ठाण्यात २२ सप्टेंबर रोजी परस्परविरोधी तक्रारींवरून १८ जणांवर गुन्हा नोंद झाला होता. २३ सप्टेंबर रोजी एका गटाच्या एकास, तर दुसऱ्या गटाच्या तिघांना पेठ बीड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
महंमद इम्रान महंमद रफीक (वय ४५, रा. मक्का चौक, मोमीनपुरा) याच्यासह इतर तीन आरोपींना २४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी तपासासाठी पोलीस कोठडीतून बाहेर काढले. मात्र, अचानक महंमद इम्रान यास उलट्या व मळमळ सुरू झाली. त्यामुळे त्यास सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावत गेल्याने २५ रोजी सकाळी औरंगाबादला खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. दरम्यान, उपचारादरम्यान तेथे महंमद इम्रानचा मृत्यू झाला.
...
इन कॅमेरा शवविच्छेदन
मयत महंमद इम्रान यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली. औरंगाबादेतील बेगमपुरा ठाण्यात शून्यने आकस्मिक मृत्यूची नोंद करून न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष घाटी रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी सीआयडीच्या पोलीस अधीक्षक लता फड यांनी भेट दिली. २६ सप्टेंबर रोजी पहाटे मृतदेह घेऊन नातेवाईक बीडला आले. सकाळी मोमीनपुरा भागात पोलीस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला.
...
नातेवाइकांचा आक्षेप नाही
शवविच्छेदन अहवाल अद्याप आला नसून डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. मात्र,
या प्रकरणात अटकेपासून ते संबंधिताला दवाखान्यात दाखल करेपर्यंत पोलिसांनी सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पाडलेली आहे. नातेवाइकांचा कुठला आक्षेप नाही. प्रकरण सीआयडीकडे वर्ग झाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली.
....