लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील संभाजीनगरातील रहिवासी असलेल्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना समजल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी जिल्हा रूग्णालयाकडे निघालेल्या मित्राचाही हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला.राजाराम घोडके (वय ६२ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. शनिवारी रात्री त्यांनी पत्नी व मुलांसमवेत जेवण केले. त्यानंतर सर्व आपापल्या खोलीत जाऊन झोपले. घोडके यांच्यासाठी स्वतंत्र खोली आहे. याच खोलीत त्यांनी रात्री खिडकीच्या पडद्यासाठी लावलेल्या अँगलला कापड्याच्या पडद्याने गळफास घेतला. सकाळी पत्नी त्यांना उठविण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर तात्काळ शिवाजीनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पो.नि. शिवलाल पुर्भे, पो.उप नि. बी. एस. ढगारे यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. शिवाजीनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.उत्तम घोडके व दिलीप टाक हे संभाजीनगर भागात शेजारी राहत असत. टाक हे खाजगी नोकरी करत. समवयस्क असल्याने त्यांची घोडके यांच्याशी गट्टी होती. रविवारी सकाळी घोडके यांनी आत्महत्या केल्यानंतर टाक त्यांच्या घरी गेले. मृतदेह पाहून टाक यांना अश्रू अनावर झाले. ते घराजवळच अबोल बसलेले होते. पंचनाम्यानंतर घोडके यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला. टाक हे पायीच जिल्हा रुग्णालयाकडे निघाले. नगर रोडवर एलआयसी कार्यालयासमोर त्यांना हृदयविकाराचा धक्का आला अन् ते रस्त्यावरच कोसळले. त्यांना विलास विधाते व इतरांनी जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले. घोडके यांच्या आत्महत्येनंतर अवघ्या दोन तासांतच टाक यांनी प्राण सोडले. एकाच वेळी दोघांच्या मृत्यूने संभाजीनगरवर शोककळा पसरली.
निवृत्त पोलिसाच्या आत्महत्येनंतर मित्राचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:18 AM