लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : मातावळी परिसरात असलेल्या डोंगरात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच वनविभाग, पशुवैद्यकीय पथकाने शुक्रवारी सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तो बिबट्याच असल्याचे निष्पन्न झाले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा बिबट्या नैसर्गिक कारणामुळे मृत झाल्याचे सांगितले.
आष्टी तालुक्यातील मातावळी गावापासून लागूनच असलेल्या कोसिंब डोंगरात बिबट्या मृतावस्थेत कुजून पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी प्रकाशित करताच वनविभागाला जाग आली. वरिष्ठ अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. तो बिबट्याच असल्याचे निष्पन्न झाले. या बिबट्याचा सांगडा झाल्याने सर्वासमक्ष त्याची येथेच जाळून विल्हेवाट लावली, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी दिली.
बिबट्याचा मृत्यू दीड ते दोन महिन्यापूर्वीच झालेला असावा. त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असल्याचे आष्टी येथील पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी सांगितले.
....
वनविभाग झोपला होता का?
आष्टी तालुक्यातील मातावळी डोंगरात दीड ते दोन महिन्यापूर्वी बिबट्याचा मृत्यू होतो. याची वनविभागाला कसलीच खबर नसावी हे दुर्दैव आहे. यावरून वनविभागाचे हद्दीत किती लक्ष आहे हे दिसून येत आहे. या बिबट्याचा मृत्यू होऊन त्याची माती झाली तरी वनविभागाला समजले नाही का? असा प्रश्न शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.
....
घटनास्थळी वन अधिकाऱ्यांनी दिली भेट
मृत अवस्थेत पडलेल्या बिबट्याची पाहणी करण्यासाठी विभागीय वन अधिकारी मधुकर तेलंग, वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ, तालुका पशुधन अधिकारी डॉ. मंगेश ढेरे, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शामदिरे यांनी सकाळी अकराच्या सुमारास भेट दिली. त्याची पाहणी करीत बिबट्या असल्याची खात्री करून त्याची तेथे विल्हेवाट लावली.
.....