शिरूर कासार : श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रायमोह ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात तपासणी केली असता त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे रूग्णालय अधिष्ठाता तथा नोडल व ऑफिसर डॉ. शिवनाथ वाघमारे यांनी सांगितले. नियमानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत व नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी केल्याची माहिती त्यांनी दिली.
दगडवाडी येथील साठ वर्षीय रुग्ण श्वास घेताना त्रास वाटू लागल्याने ग्रामीण रुग्णालयात आला होता. तो नुकताच चारधाम यात्रेला जाऊन आला होता, असे सांगण्यात आले. प्रकृती लक्षात घेता त्याला बीड येथे उपचारासाठी पाठविण्यात येणार होते. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. नागरिकांनी मास्कशिवाय गरजेशिवाय बाहेर फिरू नये, असे आवाहन डॉ. वाघमारे यांनी केले.
पहिल्या सत्रात तालुक्यात सुमारे ७२० लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. पैकी तेरा रुग्णांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी दिली. दरम्यान, दगडवाडी येथील इसमाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर डॉ. अशोक गवळी यांनी नागरिकांना दक्षतेचे आवाहन केले आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास भीतीचे कारण नाही, असे ते म्हणाले. या घटनेला दुजोरा देत तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी प्रशासन आता कठोर कार्यवाही करणार असल्याचे संकेत दिले.