सोमनाथ खताळ
बीड : जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय महामार्गांचे काम नव्याने झाले आहे. तसेच अंतर्गत छोटे, मोठेही रस्ते चांगले झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक सुसाट वेगाने वाहने चालवत आहेत. यामुळे लॉकडाऊन असतानाही ४९४ अपघांत झाले. यात तब्बल २८९ जणांचा बळी गेला असून २९५ जण गंभीर जखमी झाले आहेत. पूर्वी जखमी जास्त आणि मयत कमी असायचे. आता हे अंतर जवळपास सारखे होताना दिसत आहे.
कोरोनामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन लागले. त्याप्रमाणे एप्रिल व मे महिन्यात बीड जिल्ह्यात केवळ बोटावर मोजण्याइतकेच अपघात झाले; परंतु त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाले आणि वाहनधारक सुसाट वाहने चालवू लागले. त्यातच जिल्ह्यातील छोट्या रस्त्यांपासून ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतचे सर्वच रस्ते नव्याने झाले आहेत. त्यामुळे वेगावरही नियंत्रण राहिले नाही.
२२ अपघातरोध ठिकाणे
जिल्ह्यात मांजरसुंबा घाट, धारूर घाट, गेवराई बायपास अशा विविध २२ ठिकाणी सार्वाधिक अपघात होत असल्याचे वाहतूक शाखेने एकदा केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले होते. या ठिकाणी वेग मर्यादाही ठरवून दिली होती; परंतु रस्ता चांगला असल्याने वाहनधारक या नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसते.
राज्य रस्त्यांवर २०० अपघात
जिल्ह्यात राज्य रस्त्यांवर सार्वाधिक २०० अपघात झाले आहेत. यात १०० जणांचा बळी गेला आहे. राष्ट्रीय महामार्गावर १४२ अपघात झाले असून १०० जणांचा मृत्यू झाला. इतर मार्गांवर ८९ जणांचा मृत्यू झाला आहे.
एप्रिलमध्ये केवळ ७ अपघात
एप्रिलमध्ये लॉकडाऊनचा सुरुवातीचा काळ होता. यावेळी कोरोनाची भीतीही खूप होती. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत होते. याचा परिणाम अपघातांवरही झाला. या महिन्यात केवळ ७ अपघात होऊन ३ तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मे महिन्यात २७ बळी गेले होते.
काय आहेत अपघातांची कारणे
रस्ते चांगले झाल्याने वेगावर नियंत्रण राहिले नाही. दारू पिऊन वाहने चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे, सीट बेल्ट न लावणे, वेग नियमांचे पालन न करणे आदी कारणे अपघातांना आहेत. सार्वाधिक अपघात दुचाकींचे असून मयतही तेच जास्त आहेत.
एक नजर आकडेवारीवर
राष्ट्रीय महामार्गावर अपघात - १४२ - मयत १०० - गंभीर जखमी ८६ - किरकोळ जखमी ८ , इतर ४
राज्य महामार्गावर अपघात - २०० - मयत १०० - गंभीर जखमी ११३ - किरकोळ जखमी २०, इतर ११
इतर रस्ते अपघात - १५२ - मयत ८९, गंभीर जखमी ९६, किरकोळ जखमी ५, इतर ३
-----
पुरुष मयत २६७, गंभीर जखमी २५७, किरकोळ जखमी २९
महिला मयत २२, गंभीर जखमी ३८, किरकोळ जखमी ४
----
एकूण अपघात - ४९४
मयत - २८९
गंभीर जखमी - २९५
किरकोळ जखमी - ३३
----------महिनानिहाय आकडेवारी
महिना अपघात मयत जखमी
जानेवारी ६२ ३६ ३७
फेब्रुवारी ५३ १७ ४९
मार्च ४३ २४ २६
एप्रिल७३४
मे २७ १८ १६
जून ४३ ३२ २५
जुलै ४१ ३१ १६
ऑगस्ट ५१ ३१ ३१
सप्टेंबर ५५ ३१ ३०
ऑक्टोबर ६० ३४ ४८
नोव्हेंबर ५२ ३२ ४६
एकूण ४९४ २८९ ३२८