बीड : कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल १६ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली तर नव्या १०२४ रुग्णांची भर पडली. ७०१ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या पाच हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी ४ हजार १०८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ३ हजार ८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १ हजार २४ नवे रुग्ण आढळून आले. अंबाजोगाईमध्ये सर्वाधिक २३१ नवे रुग्ण आढळून आले तर आष्टीत १११, बीडमध्ये २०६, धारुरमध्ये ५०, गेवराईत ४५, केजमध्ये १२२, माजलगाव ५०, परळीत १०१, पाटोदा ४७, शिरुरमध्ये ४६, वडवणी १५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ७०१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ४५८ इतकी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३५ हजार ७३४ इतकी असल्याची माहिती जि.प.सीइओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
१६ मृत्यूसह संख्या ७६६
जिल्ह्यात मंगळवारी १६ बळींची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात बीडमधील शिंदेनगरातील ५५ वर्षीय पुरुष, येळबंघाट (ता.बीड) येथील ५७ वर्षीय पुरुष, बेलगाव (ता.बीड) येथील ७० वर्षीय पुरुष, काठोडा (ताग़ेवराई) येथील ७० वर्षीय महिला, गेवराई तालुक्यातीलच नंदपूर येथील ५५ वर्षीय पुरुष, वडवणी तालुक्यातील ४० वर्षीय महिला, केजमधील प्रशांत नगरातील ५५ वर्षीय पुरुष, डिघोळअंबा (ता.अंबाजोगाई) येथील ५२ वर्षीय पुरुष, नागापूर (ता.परळी) येथील ४० वर्षीय महिला, टोकवाडी (ता.परळी) येथील ५२ वर्षीय पुरुष, केजमधील फुलेनगरातील ६५ वर्षीय महिला. मुरकूटवाडी (ता.अंबाजोगाई) येथील ५५ वर्षीय पुरुष, अंबाजोगाईतील जयवंतीनगरातील ६४ वर्षीय पुरुष व तालुक्यातील लोखंडी येथील ६९ वर्षीय पुरुष व अन्य दोघांचा समावेश आहे. आता एकूण मृत्यूसंख्या ७६६ इतकी झाली आहे.