बीड : परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेत भाजलेल्या तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मधुकर आदनाक, सुभाष कराड व गौतम घुमरे अशी मृतांची नावे आहेत .
परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाच्या टाकीचा कॅप शुक्रवारी दुपारी गळून पडला. त्यामुळे टाकीतील गरम रस तेथील कामगार व कर्मचा-यांच्या अंगावर पडला. त्यात बारा जण भाजले. जखमींवर लातूर व अंबेजोगाई येथे उपचार सुरु होते. यातील एकाचा रात्री १२.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता मृतांचा आकडा वाढला असून एकूण तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मधुकर आदनाक, सुभाष कराड व गौतम घुमरे अशी मृतांची नावे आहेत .
परळी-बीड राज्य रस्त्यावर पांगरी शिवारात अठरा वर्षांपूर्वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी या साखर कारखान्याची उभारणी केली. सध्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा गेल्या हंगामात हा कारखाना उसा अभावी बंद होता. यंदा काही दिवसांपूर्वीच ऊस गाळपास प्रारंभ झाला होता. शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास कारखान्यातील उसाच्या रसाने भरलेल्या टाकीचे कॅप गळून पडले. साखर प्रक्रियेसाठी हा रस दुस-या टाकीत नेण्यापूर्वीच गरम रसाची ही टाकी फुटल्याने कर्मचा-यांच्या अंगावर उकळलेला रस पडला. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. यात कारखान्याचे काही कर्मचारी व खाजगी कंत्राटदाराचे काही कामगार जखमी झाले. हा रस ४०० डिग्री सेल्सिअस इतका उष्ण होता, अशी माहिती आहे.