लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जुन्या भांडणातून दोन गट समोरासमोर भिडले. यामध्ये एकावर कुकरीने वार करून खून केला. तर इतर काही लोक जखमी झाले. ही घटना बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील बसस्थानकात गुरूवारी दुपारी घडली. या घटनेनंतर राजुरीत तणावपूर्ण शांतता होती. या घटनेने खळबळ उडाली आहे.गणेश नारायण बहीर (वय ३०) असे मयत तरुणाचे नाव आहे. गणेश हा तरुण ऊसतोड मुकादम म्हणून व्यवसाय करत होता. भावकीतीलच संजय बहीर व अन्य जणांसोबत वर्षभरापासून त्यांचा वाद सुरु होता. याच वादातून वर्षभरापूर्वी गणेश यांची चारचाकी गाडीही जाळण्यात आली होती. गुरुवारी दुपारी राजुरी बसस्थानक परिसरात पुन्हा काही कारणांवरुन गणेश बहिर व संजय बहिर यांच्यातील वाद उफाळून आला. दोघांच्याही गटाचे लोक समोरासमोर आले आणि एकमेकांना मारहाण करु लागले. यातील काही लोकांकडे शस्त्रे होती. यातीलच एकाने गणेश यांच्या छातीवर कुकरीसारख्या हत्याराने वार केला. हा वार वर्मी लागल्याने गणेश याचा काही वेळातच मृत्यू झाला. त्यानंतर गणेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. येथे नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात संजय बहीरसह अक्षय गात, किरण बहीर, राहुल बहीर, बाळू बहीर, वैभव काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच वैभव काळेला पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे यांनी बेड्या ठोकल्या.दरम्यान, गणेशच्या मृत्यूची माहिती समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी रुग्णालयात धाव घेत जबाब नोंदवले. ते रुग्णालयात तळ ठोकून होते. गणेशच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
नवगण राजुरीत दोन गटांत वाद; एकाचा कुकरीने खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:06 AM
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जुन्या भांडणातून दोन गट समोरासमोर भिडले. यामध्ये एकावर कुकरीने वार करून खून केला. तर ...
ठळक मुद्देजुना वाद उफाळला : सहा जणांविरुद्ध गुन्हा; एकास अटक