बीड : बनावट बोअरवेलच्या नावाने आमिष दाखवून ३ लाखांचे पाईप मागवून लातूर येथील व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मेहजबीन रबानी पठाण (रा. लातूर) हा गुडविल प्लास्टिक कंपनीत काम करतो. त्याला गजानन पाटील नामक इमसाने वेळोवेळी मोबाईलद्वारे कॉल करून बनावट बोअरवेलच्या नावाने ऑर्डरचे आमिष दाखविले. गुडविल पॉलीप्लास्ट कंपनीचे ३ लाख २३ रुपये किमतीचे १७० प्लास्टिक पीव्हीसी पाईप लातूर येथून मागवून घेतले व ते बीड तालुक्यातील आहेर वडगाव शिवारात उतरविण्यास सांगितले. त्यानुसार ९ जानेवारी रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आहेर वडगाव शिवारात पाईप उतरवून घेतले व पैसे न देता पसार झाले. या प्रकारामुळे मेहजबीन रबानी पठाण यांनी त्यांना आलेल्या नंबरनुसार गजानन पाटील यास फोन लावला असता मोबाईल बंद होता. त्यामुळे आपली दिशाभूल व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पठाण यांनी ११ जानेवारी राेजी फिर्याद नोंदविली. त्यानुसार बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक साबळे करीत आहेत.