बीड : जिल्ह्यात झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोना प्रादुर्भावात रविवारी काहीशी घसरण झाली. १३४५ नव्या बाधितांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ५६ हजार ८६८ इतकी झाली आहे. १०९१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आणखी सहाजणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने एकूण बळींचा आकडा ९४८ इतका झाला आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी १ हजार ५१२ नव्या बाधितांची भर पडली होती, तर १०३५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. शिवाय २८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. शनिवारी ४ हजार ७९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. याचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. यापैकी दोन हजार ७३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर एक हजार ३४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ३३८ रुग्ण आढळले. अंबाजोगाई १९२, आष्टी ६०, धारुर ६२, गेवराई १८३, केज १४८, माजलगाव ६५, परळी १०६, पाटोदा ४८, शिरुर १०४, वडवणी तालुक्यातील ३९ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, सहाजणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात युसूफवडगाव (ता. केज) येथील ६० वर्षीय पुरुष, शिरुर येथील ६० वर्षीय महिला, मनुबाई जवळा (ता.गेवराई) येथील ६० वर्षीय पुरुष, आष्टी तालुक्यातील खडकत येथील ७० वर्षीय पुरुष, भतानवाडी (ता. अंबाजोगाई) येथील ८० वर्षीय पुरुष, बीडमधील खंडेश्वरी रोडवरील ४५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. एकूण बळींची संख्या ९४८ इतकी झाली असल्याची माहिती जि. प.चे सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.