- पुरुषोत्तम करवा
माजलगाव (बीड) : तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे उत्पन्न कमालीचे घटले असुन यावर्षी 56 हजार क्विंटल कापुस कमी झाला आहे. यामुळे शेतक-यांना तब्बल शेतक-यांना 50 कोटींचा फटका बसला आहे. याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर पडला असून ती ओस पडल्याचे चित्र सद्या पहावयास मिळत आहे.
पांढर सोनं म्हणून ओळखण्यात येत असलेल्या कापसाच्या उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळते. यामुळे माजलगांव तालुक्यात कापसाचे पिक मोठया प्रमाणावर घेण्यात येते. कापसाच्या पिकावर शेतक-यांची भिस्त असते,यातून मिळणा-या उत्पन्नातूनच शहराची बाजारपेठ देखील मोठयाप्रमाणावर चालते. तालुक्यात खरीप हंगामात एकुण जमीनीपैकी 50 टक्के पेरा हा कापुस या पिकाचा असतो. मागील वर्षी 35 हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती त्या तुलनेत या वर्षी 38 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र, क्षेत्रात वाढ होऊनही उत्पन्नत मात्र वाढ झाली नाही.
शेवटच्या टप्प्यात बोंडअळीचा फटका या वर्षी पडलेल्या पावसाची सरासरी पाहता शेवटच्या टप्प्यात कापसाचे चांगले उत्पन्न शेतक-यांनी गृहित धरले होते. मात्र, बोंडअळीच्या प्रभावामुळे शेवटच्या टप्प्यात उत्पादनात घट झाली. 80 टक्के शेतक-यांच्या एक दोन वेचण्या झाल्यानंतर कापसाचा झाडा झाला.
गेल्यावर्षी कापसाला सरासरी 4 हजार 150 ते 5 हजार 575 इतका भाव मिळाला होता. गेल्यावर्षी 31 डिसेंबर 2016 पर्यंत 2 लाख 41 हजार 114 क्विंटल कापुस बाजार समिती कार्यक्षेत्रात 10 जिनींगच्या माध्यमातुन खरेदी झाला. यातुन शेतक-यांना 126 कोटी 91 लाख 86 हजार 127 रुपये मिळाले होते. या वर्षी 31 डिसेंबर 2017 पर्यंत बाजार समिती कार्यक्षेत्रात 10 जिनींग मार्फत 1 लाख 85 हजार 350 क्विंटल कापसाची खरेदी झाली जी गेल्यावर्षीच्या तुलनेत 55 हजार 764 क्विंटलने कमी आहे. शेतक-यांना यावर्षी सरासरी 4 हजार 200 ते 5 हजार 200 इतका भाव मिळाला यातुन शेतक-यांना 82 कोटी 30 लाख 66 हजार 148 येवढी रक्कम मिळाली ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 44 कोट 61 लाख 19 हजार 997 रुपयांनी कमी झाले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव डी.बी. फुके यांनी दिली. गेल्यावर्षी कापसाचे उत्पन्न चांगले झाल्यामुळे यावर्षी माजलगांव तालुक्यात कापसाची लागवड ही 3 हजार हेक्टरने वाढली. त्या तुलनेत उत्पन्नात मात्र घट झाली. याचा परिणाम थेट येथील बाजार पेठेवर झाला असुन मागील दोन महिन्यांपासुन बाजारपेठेत शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
५० कोटीचा फटका बसला यावर्षी कापसाचे उत्पादन घटल्याने यातून कमी उत्पन्न मिळाले आहे. याचा फटका थेट शहराच्या बाजारपेठेवर झाला असून त्यातून 50 कोटी कमी झाले आहेत. - अशोक डक, सभापती, माजलगाव बाजार समिती