: येथून जवळच केज रस्त्यावर रविवारी दुपारी अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा जागीच मृत्यू झाला. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अज्ञात वाहन धारकाविरूध्द गुन्हा नोंदवून पुढील कार्यवाही सुरू केली आहे
धारूर केज रस्त्यावर रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक एस. ए. मोराळे, वनमजूर वशिष्ठ भालेराव हे घटनास्थळी पोहोचले. मात्र, हा वाहनधारक घटनास्थळाहून निघून गेला होता. वन विभागाने पंचनामा करून संबंधित अज्ञात वाहनधारकाविरूद्ध वन विभागात गुन्हा नोंद केला. मृत हरीण गर्भवती असल्याचेही शवविच्छेदनाच्या वेळी लक्षात आले. वन विभाग कार्यालयाच्या मागील जागेत मृत हरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वन विभागाने या भागातील वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी तत्काळ ठोस उपाययोजना करावीत, अशीही मागणी वन्यप्रेमींतून होत आहे.