माजलगाव : तालुक्यातील राजेगाव जवळील होना नाईक तांडा येथे एका विवाहितेला बळजबरीने विषारी द्रव पाजून खून केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. दरम्यान, ३० तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. माहेरच्या मंडळींनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिल्यानंतर चौघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. दीर, जाऊ यांचा आरोपींत समावेश असून रेशन दुकानाच्या मालकी हक्कावरून ही घटना घडल्याचे समोर आले.
मीना संतोष राठोड ( २८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. होना नाईक तांडा येथे ती कुटुंबासमवेत राहायची. राठोड कुटुंबीयाकडे रेशन दुकान आहे. भाऊ वेगवेगळे झाले. त्यानंतर एसटी महामंडळात वाहक असलेल्या विलास प्रभाकर राठोड याने दुकान आठ वर्षांपूर्वी भाऊ संतोष याच्याकडे सोपविले. मात्र, मागील तीन वर्षांपासून विलास दुकान परत मागत होता. संतोष व त्याची पत्नी मीना यांचा यास विरोध होता. या कारणावरून त्यांच्यात सतत भांडणे होत. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विलास प्रभाकर राठोड, कविता विलास राठोड, बाळू शंकर पवार व पारूबाई प्रभाकर राठोड (सर्व रा. होना नाईक तांडा, राजेगाव) यांनी रेशन दुकानासाठी अडसर ठरत असलेल्या मीनासोबत वाद उकरून काढला. कविता राठोडने मीनाचे केस पकडले तर बाळू पवारने दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले. यावेळी पारूबाईने तिचे तोंड उघडले व विलास राठोडने बळजबरीने विषारी द्रव पाजले. यातच ती मृत्युमुखी पडली, अशी फिर्याद मृत मीनाचे वडील पंडित थावरा जाधव (रा. पेरुनाईक तांडा राजेगाव) यांनी दिली. त्यावरून ग्रामीण ठाण्यात चौघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
....
३० तासांनंतर शवविच्छेदन
१० रोजी विष पाजल्यानंतर मीनाला तातडीने दवाखान्यात नेले नाही. रात्री उशिरा तिला तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी ती मृत झाली असल्याचे घोषित केले.
मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींनी पलायन केले. त्यामुळे माहेरच्यांना संशय आला. खुनाचा गुन्हा नोंदविण्यासाठी त्यांनी ग्रामीण ठाण्यासमोर ठिय्या दिला. त्यानंतर ३० तासांनी गुन्हा नोंदविल्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला.
....
पोलिसांची हलगर्जी, आरोपींचे पलायन
या प्रकरणात माजलगाव ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. घटनास्थळीही पोलीस उशिराने पोहोचले. तक्रार नोंदवून घेण्याऐवजी माहेरच्या मंडळींनाच पोलिसांनी सुनावले. त्यामुळे नातेवाईक आक्रमक झाले. या सगळ्यात ३० तास उलटले. या दरम्यान चारही आरोपींनी पोबारा केला. पोलिसांनी संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळले असते तर ३० तास शवविच्छेदन रखडले नसते व आरोपींनाही बेड्या पडल्या असत्या.
...
----------
110921\11bed_23_11092021_14.jpg
ठिय्या