बीड : शिरूरकासार नगर पंचायतीचे ५ नगरसेवक पक्षातंरबंदीच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तसेच बीड येथील न.प.च्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी १ नगरसेवक असे ६ नगरसेवक अपात्र करण्यात आले आहेत. गुरुवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी हा निर्णय दिला.
शिरुर कासार नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष मीरा गाडेकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या व सध्या भाजपसोबत असलेल्या ५ नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्याचा भंग केल्यामुळे अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिरुर नगरपंचायत समितीमधील भाजपची सत्ता अल्पमतात आली आहे. शिरुर कासार नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी ५ डिसेंबर २०१८ रोजी मतदान झाले होते. यामध्ये राष्ट्रावादीचे रोहिदास गाडेकर यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला मतदान करण्याचा व्हीप पक्षाने काढला होता.
मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या परंतु भाजपचे आ.सुरेश धस यांच्या समर्थक मीरा गाडेकर यांना नगराध्यक्ष करण्यासाठी इतर चार नगरसेवकांनी मदत केली होती. याप्रकरणी नगराध्यक्ष मीरा गाडेकर व त्यांना मतदान करणारे कुसुम हिदास, शेख शमा अन्वर,आशा शिंदे, आश्विनी भांडेकर या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्रतेची कारवाई करावी, यासाठी विश्वास नागरगोजे व इतरांनी जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल केली होती. याप्रकरणी कालमर्यादेत निकाल देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. दोन्ही बाजूची सुनावणी झाल्यानंतर पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निरीक्षण नोंदवत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शिरुर न.प.च्या नगराध्यक्षांसह इतर ४ जणांना अपात्र ठरवले आहे. यामुळे भाजपची सत्ता अल्पमतात आली आहे.
बीड न.प.चा नगरसेवक अपात्रबीड नगरपालिकेतील काकू -नाना आघाडीचे नगरसेवक अब्दुल खदिर अब्दुल गणी यांनी नगरपालिकेच्या रस्त्यावर अतिक्रमण करून ९० फुटांपेक्षा अधिक जागा बळकावली होती. याप्रकरणी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, यासाठी मोमीन मो.जकी यांनी याचिका केली होती. यासंदर्भात देखील सुनावणी झाली. यामध्ये देखील अतिक्रमण केल्याचे सिद्ध होत असल्याने त्यांना अपात्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिला आहे.