कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणावर साठलेले आहेत. या कचऱ्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात येत नसल्याने कचऱ्याचे मोठमोठे ढीग ठिकठिकाणी दिसून येतात. परिणामी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाने योजनांच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रियेची मागणी होत आहे.
फळगाड्यांचा वाहनांना अडथळा
केज : शहरातील मुख्य रस्त्यांवरच फळविक्रेते त्यांचे गाडे लावत आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत असून, अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होत आहे. या फळविक्रेत्यांचे गाडे त्वरित तेथून हटवावेत आणि होणारी वाहतूक कोंडी थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
जनावरे रस्त्यावर
माजलगाव : शहरातील रस्त्यांवर अनेक मार्गावर जनावरे ठिया मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेकवेळा अपघात झाल्याचेदेखील उदाहरणे आहेत. ही जनावरे रस्त्यावरुन हटवावीत, अशी मागणी वाहनधारक, नागरिकांमधून केली जात आहे.
बसस्थानकाची दुरवस्था
मांजरसुंबा : येथील बसस्थानकात शौचालयासह इतर सुविधांचा अभाव आहे. तसेच दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. धुळे - सोलापूर महामार्गावरील तसेच लातूर, पुणे या मार्गावरील बसेस येथे थांबतात. स्थानकात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
रेशन दुकानांमध्ये भावफलक दिसेना
अंबाजोगाई : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दर्शनी भागात अनेक दुकानदारांनी धान्याचे दरपत्रक लावलेले नाहीत. तसेच अनेक दुकानांमध्ये तक्रार पेटीदेखील ठेवण्यात आली नाही. त्यामुळे रेशन धान्याचा साठा व शासकीय किमती याची माहिती उपलब्ध होत नाही. रेशन दुकानदारांनी दरपत्रकाचा फलक लावावा, असा नियम असतानाही दुर्लक्ष आहे.