अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई (जि. बीड) : तालुक्यातील धानोरा (बुद्रुक) येथील महिलांनी रविवारी सकाळी एकत्रित येऊन मारुतीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. वर्षानुवर्षे प्रवेशासाठी मज्जाव असणारी ही रूढी-परंपरा महिलांनी संघटित होऊन मोडीत काढली. ग्रामीण भागातील महिलांनी संघटित होऊन पुकारलेल्या या परिवर्तनाच्या लढ्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.
महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नसणे आणि पुरुषांना प्रवेश असणे म्हणजे लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव आहे. महिलांना केवळ मासिक पाळी येते आणि त्या काळात तिला विटाळ म्हणून लांब ठेवणे योग्य नाही. तर महिलेच्या मासिक पाळीमुळे सर्वांच्या जन्माची वेळ येते. त्यामुळे मासिक पाळीला आनंदाने समाजाने स्वीकारले पाहिजे, असे मत गावातील सामाजिक कार्यकर्त्या आशालता आबासाहेब पांडे यांनी धानोरा गावातील महिला मंडळाच्या बैठकीत व्यक्त केले. पांडे यांनी गावातील सर्व महिलांना संघटित करून हा लढा उभारला. मारुती मंदिरात महिलांना प्रवेश नाही, ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला.
रविवारी सकाळी आशालता आबासाहेब पांडे, चित्रा बाळासाहेब पाटील यांनी निश्चय व्यक्त करून महिलांना सोबत घेत मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला व नारळ फोडले. महिलांना मज्जाव असतो. ही पिढ्यान् पिढ्यापासून चालत आलेली प्रथा परंपरा महिलांनी मोडीत काढली.
nमारुती हा ब्रह्मचारी आहे. नारळ हे फक्त पुरुषांनीच फोडायचे; पण या सामाजिक व्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न धानोरा बुद्रुक येथील एकल महिला संघटनेच्या कार्यकर्त्या आशालता पांडे, चित्रा पाटील व मंडळातील सर्व महिलांनी केला आहे.
आम्हाला पण भारतीय संविधानाने अधिकार दिला आहे. त्या अधिकाराचा वापर करून आगामी काळात ही महिलांचे मजबूत संघटन करून जुन्या प्रथा, अंधश्रद्धा मोडीत काढू.-आशालता पांडे, सामाजिक कार्यकर्त्या, अंबाजोगाई.