धारूर : शासकीय केंद्रावर आठवड्यातून केवळ एक दिवस कापूस खरेदी करण्यात येते असल्याने येथे कापसाच्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. रांगेत थांबून आठ दिवसानंतर कापूस खरेदीस नंबर लागत असल्याने शेतकऱ्यात संतापाचे वातावरण आहे. याला वैतागून एका शेतकऱ्याने गुरुवारी कापसाच्या गंजीवर चढत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली.
धारूर तालूक्यात आठवड्यातील केवळ तीन दिवस शासकीय केंद्रावर कापूस खरेदी केली जाते. यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत असून कापसाच्या मापासाठी किमान आठ दिवस केंद्राबाहेर वाट पहावी लागत आहे. येथील गुरू राघवेंद्र जिनिंगवर तीन दिवसांपासून उभ्या वाहनांतील काही वाहने बुधवारी राञी आता घेण्यात आली. यावेळी कापसाचे माप करण्यात आले मात्र वाहन रिकामे करण्यात आले नाही. दरम्यान, जिंनीग बाहेर पन्नास पेक्षा जास्त वाहनांची रांग होती. यामुळे गुरूवारी सकाळी शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले. यातच एका शेतकऱ्यांना गंजीवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून इतर शेतकऱ्यांनी त्याची समजूत काढल्याने पुढील अनर्थ टळला.
या प्रकाराची माहिती मिळताच तहसीलदार व्ही एस शेडोळकर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, पोलीस निरीक्षक विश्वनाथ नाईकवाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्ता सोंळके हे संबंधीत जिंनीगवर पोहचले. पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तात्काळ कापूस खरेदी करण्यास भाग पाडले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, कापसाची आवक पाहून शासकिय केंद्रात नियमित खरेदी सुरु करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .
सुरळीत कापूस खरेदी साठी प्रयत्नशील धारूर व केज तालूक्यात शासकीय कापूस खरेदीची सहा केंद्र सुरू आहेत. ग्रेडर कमी असल्याने रोज एका केंद्रावर खरेदी करण्यात येते. शेतकऱ्यांची अडचण न होता सुरळीत खरेदी व्हावी यासाठी पणन महासंघ उपाययोजना करेल. - एस. एस. इंगळे, उप विभागीय व्यवस्थापक, पणन महासंघ