बीड : घराचे सर्च वॉरंट नसताना १२ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली पोलिसांनी घराची झडती घेत घरातील कॉम्प्युटरची हार्डडिस्क, एक पुस्तक व इतर साहित्य नेल्याप्रकरणी पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनूचे वडील तथा येथील माजी नगराध्यक्ष शिवलाल मुळूक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
शिवलाल मुळूक यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, १२ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान त्यांच्या चाणक्यपुरी (बीड) येथील घरी दोन व्यक्ती आल्या. त्यांनी दिल्ली पोलीस असल्याचे सांगून, ओळखपत्र दाखवत आम्हाला शंतनूविषयी चौकशी करावयाची असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी माझ्या घराची झडती घेत शंतनूच्या रूममधून एका संगणकाची हार्डडिस्क, एक पुस्तक, मोबाईल कव्हर व पर्यावरण पोस्टरदेखील जप्त केले. तसेच दिल्ली येथे गेल्यानंतर हे साहित्य परत दिले जाईल, असे तोंडी आश्वासन त्यांनी दिले; परंतु हे सर्व करताना त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला सर्च वॉरंट दाखवला नाही किंवा साहित्य जप्तीसंदर्भातदेखील लेखी काही दिले नाही. तसेच जप्त केलेल्या वस्तूंचा पंचनामादेखील केला नाही. ही कारवाई करताना स्थानिक प्रशासनातील अधिकारी त्यांच्यासोबत नव्हते. १२ फेब्रुवारीपासून ते लोक बीडमध्येच थांबलेले आहेत. त्यांनी दोन ते तीन वेळा कॉल करून शासकीय विश्रामगृहावर बोलावून घेत शंतनूबाबत माझ्याकडे चौकशी केल्याचे मुळूक यांनी निवेदनात नमूद केले आहे. दिल्ली पोलिसांनी घराच्या झडतीचे पत्र किंवा साहित्य जप्तीचे पत्र न दाखवता त्यांनी कारवाई केली. या प्रकाराची नोंद घेऊन बीड पोलीस अधीक्षकांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मुळूक यांनी निवेदनाद्वारे अधीक्षकांकडे केली आहे.
दिल्ली पोलिसांनी सर्च वॉरंट नसताना साहित्य जप्त केल्याची शंतनू मुळूक यांच्या वडिलांची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल.- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड