अंबाजोगाई : संजय गांधी निराधार योजनेसह शासनाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांचे अनुदान घरपोच देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतरही ४ विषयांच्या अनुषंगाने बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी जिल्हाधिकारी यांना २५ मे रोजी निवेदन दिले आहे.
मागील एक वर्षापासून आपण कोरोना या महामारीशी लढा देत आहोत. यासाठी बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. परंतु, प्रशासनाने आम्ही केलेल्या सूचनांचा संवेदनशीलपणे विचार करावा. संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना यासह शासनाच्यावतीने सुरू असलेल्या विविध योजनांतील विद्यमान लाभार्थ्यांचे अनुदान लातूर जिल्ह्याच्या धर्तीवर बीड जिल्ह्यात घरपोच देण्यात यावे. यामुळे निराधार,वृद्ध व गरजू लाभार्थ्यांना लॉकडाऊनमध्ये फायदा होईल, असे निवेदनात मोदी यांनी म्हटले आहे.
अंबाजोगाई शहरात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतीमान करण्यात यावी, लसीकरण नोंदणी प्रक्रिया सोपी करून लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, मागील दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून किराणा मालाचे दुकाने बंद आहेत. यामुळे दैनंदिन जीवनाश्यक वस्तू मिळणे कठीण बनले आहे. अशावेळी अत्यावश्यक सेवेतील किराणा विक्रीची दुकाने नियोजित वेळेत सुरू करावीत, बँकेचा कालावधी कमी असल्याने तसेच लवकरच पेरणीसाठी शेतकरी बांधवांना आणि दैनंदिन गरजेचे वस्तू खरेदी करण्यासाठी सर्व सामान्य जनतेला बँकिंग व्यवहार करणे गरजेचे आहे तेव्हा बँकांचा सुरू असण्याचा कालावधी वाढवावा. पावसाळा सुरू होणार असल्याने अनेकांची सुरू असलेली बांधकामे बंद अवस्थेत आहेत. कारण बांधकामासाठी लागणारे साहित्य विक्रीची दुकाने बंद आहेत. ही दुकाने नियोजित वेळेत सुरू करावीत, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदरील निवेदनावर अंबाजोगाई शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव आदमाने, नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक अमोल लोमटे, सुनील व्यवहारे, धम्मपाल सरवदे, माणिक वडवणकर, सुनील वाघाळकर, राणा चव्हाण, भारत जोगदंड, जावेद गवळी, महेबूब गवळी, सुशिल जोशी, प्रताप देवकर, अजीम जरगर, बालाजी जोगदंड, अमोल मिसाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.