परळी ( बीड ) : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत गुरुवारी शहरातून निघालेल्या भाजपच्या मदतफेरीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक दानशूर नागरिक वस्तू आणि निधीच्या स्वरूपात मदत करण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले. विविध भागात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामळे महाराष्ट्रावर मोठं संकट आलं आहे. सध्या तरी याचा विचार करणं आवश्यक आहे असं सांगून पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी त्याठिकाणी मदत पोहोचवणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी जाहीर केले. ( 'Delivering help instead of touring'; Pankaja Munde rushed to the aid of the flood victims)
शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मदतफेरीला सुरवात झाली. बस स्थानक रोड, एकमिनार चौक, स्टेशन रोड, टाॅवर, गणेशपार आदी प्रमुख मार्गावरून ही मदतफेरी काढण्यात आली. २६ जुलै रोजी पंकजा मुंडे यांचा वाढदिवस होता. राज्यातील विविध भागात पुरामुळे झालेले नागरिकांचे प्रचंड नुकसान लक्षात घेता पंकजा मुंडेंनी केलेल्या आवाहनानुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने शहरातून भाजप कार्यकर्त्यांनी मदतफेरी काढली.
पंकजा मुंडे या मदतफेरीत स्वतः सहभागी झाल्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच वैद्यनाथ काॅलेजचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. फेरी निघाल्यानंतर काही वेळातच मोठी रक्कम जमा झाली तसेच व्यापाऱ्यांनी किराणा साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना दिल्या. ही सर्व मदत एकत्रित ट्रकद्वारे पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे.
कार्यकर्त्यांचं कौतुक यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, आम्ही प्रत्येक संकटात मुंडे प्रतिष्ठानतर्फे मदत करत असतो. वाढदिवस हा नेत्याचा सोहळा असतो. पण व्यक्तीचा सोहळा मुंडे साहेबांना मान्य नव्हता. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती माझ्या वाढदिवसाला सोहळा नको. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी सूचवलं मदत फेरी करुन पूरग्रस्तांना मदत करुया. माझ्या कार्यकर्त्यांचं कौतुक आहे.
सध्या दौरा नाही, मदत पोहचवणारमी परळीची आहे, परळीची कार्यकर्ती आहे, त्यामुळे इथे मी रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत आहे. पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी मदत तिथे गेली तर ते फायद्याचं आहे. आपण तिथे जाण्यापेक्षा, तिथे मदत पोहोचावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. परिस्थिती खूप कठीण आहे, बिकट आहे. काही गावं मुख्य प्रवाहातून तुटली आहेत. त्यांना उभं करावं लागेल. अशा परिस्थितीत त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. मी सध्या तरी त्याठिकाणी जाणार नाही. मी जाण्याने गर्दी होऊन यंत्रणांवर ताण नको. त्यापेक्षी मी माझी मदत तिकडे पाठवेन, जिथे पूरग्रस्तांना मदत हवी आहे.