....
बँकांचे व्यवहार ठप्प
धानोरा : कोरोना लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील बँकांचे व्यवहार ठप्प आहेत. अनेक बँकांचे कामकाज गेट बंद करुन चालते. बँकेत ग्राहकांंना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे चेकबुक, एटीएम कार्ड, पासबुकांवरील नोंद करणे अशी अनेक कामे खोळंबली आहेत. लॉकडाऊन उठताच या कामांना बँकांनी प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.
....
पेट्रोल दरवाढीचा शेतकऱ्यांना ही फटका
बीड : पेट्रोल, डिझेलची मोठी दरवाढ झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरची नांगरणी, कोळपणीचे भाव वाढले आहेत. तसेच जेसीबीचे दर वाढले आहेत. बाजारात माल विक्रीसाठी नेण्यासाठी मालवाहतुकीचे दरवाढ झाली आहे. परंतु शेतीमालाला भाव नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
....
पाणी अडविण्याची गरज
कडा : आष्टी तालुक्याच्या डोंगराळ भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. डोंगरी भागात अजून पाणी अडविण्यासाठी हजारो ठिकाणे आहेत. याठिकाणी छोटे व मध्यम प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. अनेक नद्यांचे पाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून अडविणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने पाणी अडविल्याने पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
....
तूर पिकांकडे शेतकऱ्यांचा कल
आष्टी : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस आला की शेतकरी पेरणीच्या तयारीला लागणार आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, मूग पेरणी शिवाय यंदा तूर पिकांकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. याचे कारण तूर पिकांच्या काढणीसाठी हार्वेस्टर मशीन सहज उपलब्ध होत आहे.
....
बोअरवेल पंप, टीव्ही जळाले
धानोरा : गेल्या १५ दिवसांपूर्वी हिवरा, पिंपरखेड परिसरात जादा दाबाने वीजपुरवठा झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल वरील मोटारी जळाल्या. अनेक नागरिकांचे घरातील टीव्ही व इतर इलेक्ट्रिकल वस्तूही नामशेष झाल्या आहेत. मोटारी जळाल्याचा शेतकऱ्यांचा मोठा फटका बसला. याबाबत महावितरणकडे विचारणा केली असता येथील सबस्टेशन मधील डिपींना आर्थिंगसाठी पाणी उपलब्ध नसल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
....
दूध दरवाढ करण्याची मागणी
आष्टी : तालुक्यात अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. दूध डेअरीवर शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. जनावरांना लागणारा चारा, पशुखाद्याचे भाव वाढले आहेत. यामुळे खर्चाचा ताळमेळ बसत नाही. तरी शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ मिळावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी वर्गातून होत आहे.
....