लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : तालुक्यात गतवर्षीपासून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी खरीप हंगामातील पिकांचा विमा भरणा करतात. परंतु, पीकविमा कंपन्यांनी आपले निकष बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी विम्यापासून वंचित राहिले. कंपनीच्या धाेरणामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्यामुळे शासन व कंपनीने पीक विम्याचे निकष बदलण्याची मागणी राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष परमेश्वर तिडके यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे .
धारुर तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये डोंगराळ क्षेत्र आहे. या क्षेत्रातील जमीन ही मुरमाड व बरड्या स्वरूपाची आहे. येथील शेतकरी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, बाजरी, हायब्रीड ज्वारी, तूर, आदी पिके घेतात. ही पिके बहुतांश पावसावर अवलंबून आहेत. यामुळे पिकास संरक्षण म्हणून दरवर्षी शेतकरी विमा कंपनीकडे पैसे भरतात. परंतु, गतवर्षी विमा कंपन्यांनी पीक विम्याचे निकष बदललेले आहेत. पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो काढून ७२ तासांच्या आत फोटो अपलोड करणे बंधनकारक केले आहे. यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गतवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्यामुळे त्यांना फोटो अपलोड करता आले नाहीत. तर काही शेतकऱ्यांकडे मोबाईल असूनही त्यांना हे फोटो कसे अपलोड करायचे याची माहिती नाही, तसेच धारूर तालुका डोंगराळ परिसर असल्यामुळे अनेक गावांमध्ये मोबाईलची रेंज नसल्यामुळे या ठिकाणाहून नुकसानीचे फोटो अपलोड करता येत नाहीत. यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कंपनीने सध्याचे निकष बदलून पूर्वीप्रमाणेच मंडलाधिकारी, तलाठी व कृषी सहायक यांच्यामार्फत नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी प्रशासनासह पालकमंत्री व लोकप्रतिनिधींकडे निवेदनाद्वारे केली आहे.
== धारूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी खरिपाचा पीक विमा भरतात. बहुतांश शेतकऱ्यांकडे अँड्राॅराईड मोबाईल नाहीत, तर काहीजणांकडे असूनही अज्ञानपणा व तांत्रिक अडचणींमुळे नुकसानीचे फोटो अपलोड करता येत नाहीत. या वर्षी शासनाने पूर्वीप्रमाणेच पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानीचा लाभ द्यावा. - परमेश्वर तिडके, अध्यक्ष राष्ट्रवादी किसान सेल धारूर